नेवासा : रखडलेली कामे गडाखांमुळे पूर्णत्वाकडे | पुढारी

नेवासा : रखडलेली कामे गडाखांमुळे पूर्णत्वाकडे

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : कोरोना कालावधीत निधी अखर्चित राहून, तो मागे गेल्यामुळे रखडलेली सर्व विकास कामे आमदार शंकरराव गडाख यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मार्गी लागल्याचे प्रतिपादन माजी सभापती सुनील गडाख यांनी केले. सोमवारी (दि.27) नेवासा तालुक्यातील जायकवाडी प्रकल्प पुनर्वसित गावठाणांतील नागरी सुविधा कामांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.

आमदार शंकरराव गडाख यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून मंजुरी मिळविलेल्या जायकवाडी प्रकल्पांतर्गत पुनर्वसित गावठाणांतील नागरी सुविधा योजनेअंतर्गत विविध कामे होणार आहेत. यावेळी उस्थळ दुमाला, उस्थळ खालसा, धामोरी, खेडले, काजळी येथे ग्रामस्थ, कार्यकर्त्यांसमोर भूमिका मांडताना या विकास कामांचे श्रेय लाटण्याच्या विरोधकांच्या केविलवाण्या खटाटोपाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. माजी सभापती गडाख म्हणाले, 2019मध्ये मंजूरी मिळालेली कामे कोरोना लॉकडाऊन काळात ठप्प झाली होती.

या कामांसाठीचा निधी याच कालावधीत अखर्चित राहिल्याने नियमानुसार तो परत शासनाकडे वर्ग होऊन कामे रखडली होती. दरम्यानच्या काळात महागाईमुळे परत तेवढ्याच निधीत ही कामे करणे व्यवहारिक दृष्ट्या अशक्य होते. परंतु, आमदार गडाख यांनी संबंधित अधिकार्‍यांना या कामांचे सुधारित अंदाजपत्रके बनविण्यास सांगून प्रक्रिया राबविण्यासाठी तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. नव्याने मंजुरी मिळवत आता, त्याला प्रत्यक्षात निधी उपलब्ध झाल्यानंतर मार्गी लागल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

होत तर काहीच नाही, श्रेय लाटायची नुसती घाई’ अशी तालुक्यातील विरोधकांची अवस्था झाल्याचा चिमटा गडाखंनी काढला. या कामांचे प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, ई-टेंडर, कार्यारंभ आदेश पाहिल्यास ही कामे आमदार गडाखांच्या माध्यमातून मार्गी लागल्याचे स्पष्ट होते. मात्र, विरोधकांकडून या कामांचे श्रेय लाटण्याची वल्गना निव्वळ हास्यास्पद असल्याचे त्यांनी पुनरुच्चार केला.

निवडणूक आली की, विरोधकांच्या भुलभूलय्याचा वायफाय कार्यान्वित होणे ही बाब तालुक्याला नवी नसून, लोकांनीच त्यांना ‘बाप दाखव नाही, तर श्राद्ध घाल’ अशा पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचे आवाहन गडाखांनी केले. यावेळी बाळकृष्ण भागवत, बाबा कवडे, आसाराम नळघे, दत्तात्रय पटारे, डॉ. अशोक ढगे, संतोष कोरडे, साईनाथ शिरसाठ, बाळासाहेब कोरडे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उस्थळ खालसा, बोरगाव, धामोरी, बहिरवाडी, गोधेगाव, बकुपिंपळगाव, खेडलेकाजळी, मंगळापूर, माळेवाडी, गळनिंब, जळके खुर्द, जळके बुद्रूक, नवीन चांदगाव परिसरातील ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

या ठिकाणी रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ
98 लाख रुपये खर्चाच्या उस्थळ दुमाला ते हंडीनिमगाव रस्ता डांबरीकरण, 99 लाख रुपये खर्चाच्या धामोरी ते पाचपीर रस्ता, 95 लाख रुपये खर्चाच्या खेडले काजळी ते जळके-गोगलगावकडे जाणारा रस्ता, 97 लाख रुपये खर्चाचा उस्थळ खालसा ते नेवासा-भालगावकडे जाणारा रस्ता, 81 लाख रुपये खर्चाच्या माळेवाडी खालसा ते बकुपिंपळगाव रस्त्यांच्या डांबरीकरणाचा प्रारंभ सुनील गडाख यांच्या हस्ते करण्यात आला.

तालुक्यातील विरोधकांची ‘होत काहीच नाही, श्रेय लाटायची नुसती घाई’ अशी अवस्था आहे. जायकवाडी प्रकल्पांतर्गत पुनर्वसित गावठाणातील नागरी सुविधा योजनेअंतर्गत भूमिपूजन केले. या कामांची प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, ई -टेंडर, कार्यारंभ आदेश पाहिल्यास ही सर्व कामे आमदार गडाख यांच्या माध्यमातून मार्गी लागली. विरोधकांकडून या कामांचे श्रेय लाटण्याची वल्गना निव्वळ हास्यास्पद आहे. निवडणूक आली की, विरोधकांच्या भुलभूलय्याचा वाय फाय कार्यान्वित झाला. जनतेने त्यांच्यापासून सावध राहावे.

                                                                  – सुनील गडाख, माजी सभापती

Back to top button