जेऊरचे ग्रामदैवत बायजामाता मंदिराचा जीर्णोद्धार | पुढारी

जेऊरचे ग्रामदैवत बायजामाता मंदिराचा जीर्णोद्धार

नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : जेऊरचे ग्रामदैवत बायजामाता मंदिर जीर्णोद्धाराचे काम एक तपानंतर अखेर पूर्ण झाले आहे. विविध धार्मिक विधी करून शुक्रवारी मंदिराचा कलश प्रतिष्ठापना सोहळा पार पडला. लोकवर्गणीतून सुमारे तीन कोटी रूपये खर्चून उभारलेले हे तालुक्यातील एकमेव मंदिर आहे. बायजामाता मंदिर सीना नदीतीरावर गर्भगिरीच्या टेकडीवर वसलेले आहे.

मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला. लोकवर्गणीतून भव्य मंदिर बांधण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रारंभ 18 डिसेंबर 2012 रोजी झाला. बायजामातेचे मंदिर तामिळनाडूतील तंजावर येथील कृष्णकोणम येथील मंदिराप्रमाणे आकर्षक व्हावे, असा निश्चय ग्रामस्थांनी केला. मंदिरासाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याने जेऊर पंचक्रोशीत जीर्णोद्धारासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले.

देवगड देवस्थानचे भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे काम सुरू झाले. मंदिराचे काम हेमाडपंथी करण्यासाठी आंध्रप्रदेश मधील कारागीर रमेश कोल्हाटी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. बायजामाता देवस्थान जागृत देवस्थान म्हणून राज्यात प्रसिद्ध असल्याने ग्रामस्थांबरोबर बाहेरून मोठी मदत झाली.

Back to top button