नगर : घोडनदीवरील बंधारे कोरडे ; शेतकरी संकटात | पुढारी

नगर : घोडनदीवरील बंधारे कोरडे ; शेतकरी संकटात

काष्टी : पुढारी वृत्तसेवा :  श्रीगोंदा तालुक्याच्या पश्चिमेकडील परिसरास वरदान ठरलेल्या घोडनदीवरील बंधारे उन्हाळा सुरू होण्याअधिच कोरडे पडले आहेत. या परिसरातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला असून, येथील पिके पाण्यावाचून जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. घोडनदीवरील बंधारे त्वरित भरून शेतकर्‍यांना आधार द्यावा, अशी मागणी विकास पाचपुते, शरद भोसले यांच्यासह शेतकर्‍यांनी केली. नदी जवळ असल्याने जवळपास विहिरी नाहीत. सर्व शेतकर्‍यांना बंधार्‍यातील पाण्याचा आधार आहे.

एकीकडे पाणी नसल्यामुळे शेतातील कृषी पंप पाण्याअभावी बंद आहेत, तर दुसरीकडे कृषी पंपाचे वीजबील भरावे म्हणून महावितरणचा शेतकर्‍यांना तगादा सुरू आहे. काही ठिकाणी बोरवेल आहेत. तेथे महावितरणच्या अधिकार्‍यांनी वीजबील भरले नाही म्हणून रोहित्र सोडून ठेऊन शेतकर्‍यांना त्रास देण्याचे सुरू केले आहे.

आर्थिक मंदी असताना शेतकर्‍यांना शेती सोडून कुठल्याही प्रकारचे उत्पनाचे साधन नाही. मोठा खर्च करून प्रत्येक शेतकर्‍यांनी बँक, पतसंस्था, सेवा सोसायटीमार्फत कर्ज काढून शेतात पिके उभी केली आहेत. परंतु, हीच पिके आता डोळ्यासमोर करपून चाललेली दिसत आहेत. कडक उन्हाळ्याची तीन महिने बकी आहेत. नदीतील पाणी संपले आहे. म्हणून श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते व शिरूरचे आमदार अशोक पवार, नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे व शिरूर हवेलीचे खासदार अमोल कोल्हे यांनी योग्य नियोजन करून घोडनदीवरील बंधारे, धरणातील पाणी सोडून भरून घ्यावे अन्यथा या परिसरातील शेतकरी उद्ध्वस्त होईल. विकास पाचपुते, शरद भोसले, राहुल लहारे, संदीप सोनवणे, विलास पाचपुते, प्रशांत वागस्कर, राहुल पालकर, सुनील औटी, पोपट माने, मनोहर पाचपुते आदींनी ही मागणी केली आहे.

पिकांसह फळबागाही जळून चालल्या
तालुक्यातून घोड व भीमा नदी वाहत असल्याने शेतकर्‍यांना मोठा आधार आहे. परंतु, भीमानदीला पाणी असले तरी घोडनदीवरील बंधारे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच कोरडे पडले आहेत. या परिसरात शेतकर्‍यांनी शेतात उभे ऊस, गहू, कांदा, कलिंगड, खरबुज, तसेच मका, कडवळ, हत्तीगवत अशी चारा पिके व फळबागाही जळून चालली आहेत.

Back to top button