नगर : आ. गडाख यांना महावितरणचा शॉक ; नेवासा दूध संघास सव्वा कोटींचा दंड | पुढारी

नगर : आ. गडाख यांना महावितरणचा शॉक ; नेवासा दूध संघास सव्वा कोटींचा दंड

सोनई :  पुढारी वृत्तसेवा : आमदार शंकरराव गडाख यांच्या अधिपत्याखाली असलेल्या नेवासा तालुका दूध संघास महावितरणने 1 कोटी 24 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. रक्कम न भरल्यास कुठल्याही क्षणी संचालक मंडळांवर फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे दूध संघ बंद करण्याची नामुष्की आमदार गडाख यांच्यावर ओढवण्याची शक्यता असून, तेथे काम करणार्‍या कामगारांचाही प्रश्न निर्माण होणार आहे. दूध संघावर झालेली कारवाई अचानक का झाली व यात राजकीय हस्तक्षेप असल्याशिवाय हे होणार नाही, अशीच चर्चा सध्या नेवासा तालुक्यात सुरू आहे.

आमदार गडाख यांच्या अधिपत्या खालील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या जागेची केसही सुरू आहे. ती जमीनही शासन जमा होऊ शकते. तसेच, स्व. गौरी गडाख प्रकरणात आमदार गडाख यांना आरोपी करावे, अशी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल आहे. यामुळे गडाख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नेवासा तालुका दूध संघास आकारलेला दंड पूर्णपणे चुकीचा व राजकीय सूडबुद्धीतून करण्यात आला आहे, असे संघ व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

दूध संघाच्या मीटरची चावी महावितरणच्या अधिकार्‍यांकडे असते. भरारी पथकाने चौकशी केली तेव्हा त्यांना वीज मीटरमध्ये कुठेही फेरफार आढळून आला नाही. तरीही 2004 पूर्वीचा दाखला देत राजकीय सूडबुद्धीने वागत दंड केला आहे. वास्तविक दोन वर्षांतून एकदा अधिकारी संघावर येऊन तपासणी करून गेले आहेत. तसे रेकॉर्ड आहे. परंतु, आठ ते नऊ वर्षांपूर्वी वीजचोरी झाली, असा अफलातून अहवाल महावितरणने बनविला आहे, असे दूध संघ व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

आमदार गडाखांना गाठले खिंडीत
मुळा एज्युकेशन विरोधात हरित लवादाची सुरू असलेली सुनावणी, स्व.गौरी गडाख प्रकरणाविषयी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका व दूध संघास झालेला 1 कोटी 24 लाख रुपयांचा दंड, यामुळे आमदार गडाख यांना विरोधकांनी खिंडीत गाठले आहे.

Back to top button