नगर : दागिन्यांसह पाच लाखांच्या ऐवजाची चोरी | पुढारी

नगर : दागिन्यांसह पाच लाखांच्या ऐवजाची चोरी

टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथे चोर्‍यांचे सत्र सुरूच आहे. येथील बसस्थानक परिसरात राहणारे प्रकाश गाडेकर यांच्या घराच्या मागील बाजूचा दरवाजा चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश करून कपाटातील 8 तोळे दागीने व रोख एक लाख रुपये असा 5 लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने या झालेल्या जबरी चोरीमुळे टाकळीभानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.  याबाबत माहिती अशी की, प्रकाश गाडेकर यांचे बसस्थानक परिसरात श्रीरामपूर- नेवासा रस्त्यावर प्रिया अ‍ॅटोमोबाईल्स दुकान व राहण्याचे घर असून काल (दि. 14) रात्री अज्ञात चोरट्यांनी   घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

घरात असलेल्या पर्समध्ये उचक पाचक केली असता पर्समध्ये कपाटाच्या चाव्या चोरांना सापडल्या. या चाव्यांच्या सह्याने चोरट्यांनी कपाट उघडून कपाटातील तिजोरीतील सोन्याचे आठ तोळ्याचे दागीने व एक लाख रूपये असा पाच लाखांचा ऐवज चोरून नेला आहे.
चोर आले तेव्हा गाडेकर कुटूंब गाढ झोपेत होते. प्रकाश गाडेकर व त्यांची पत्नी बेडरूममध्ये झोपले होते. तर आई व आजी हॉलमध्ये झोपलेले होते. तरीही त्यांना चोर आल्याचे समजले नाही. प्रकाश गाडेकर यांनी सांगितले की, मी दोन वाजता जागा झालो तेंव्हापर्यंत चोर आलेले नव्हते. त्यामुळे हे चोरटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान आले असावेत. सकाळी हे कुटूंब झोपेतून उठल्यावर घरात चोरी झाल्याचे दिसून आले. चोरीची माहिती पोलिस ठाण्याला दिल्यावर पोलिस घटनास्थळी आले व त्यांनी पहाणी केली.

आठवड्यात अनेक चोर्‍या
चार ते पाच दिवसांपुर्वीच येथील साईबाबा मंदिरावरील पितळी कळस चोरीला गेलेला असून घोगरगाव रस्त्यावरील वसंत कोकणे यांच्या घराजवळ असलेल्या भैरवनाथ मंदिरावरील 11 हजार रूपये किंमतीचा पितळी कळसाची चोरी झालेली आहे. चार फेब्रुवारी रोजीच्या रात्री श्रीरामपूर नेवासा रोडवरील दुकानदारांचे आठ सीसीटीव्ही कॅमेरे चोरी झालेले असून टाकळीभान येथे सुरू असलेल्या चोरीच्या सत्रा मुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Back to top button