नगर : ट्रॅक्टरची चोरी करणार्‍या टोळीतील तिघे गजाआड | पुढारी

नगर : ट्रॅक्टरची चोरी करणार्‍या टोळीतील तिघे गजाआड

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  येथील ग्रामीण पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत ट्रॅक्टर चोरी करणार्‍या टोळीतील तिघांना गजाआड केले. तर तीन जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. पकडलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 12 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पकडलेल्या आरोपींमध्ये एक अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.  पत्रकार परिषदेत माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव म्हणाले, कोपरगाव तालुक्यात मागच्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना अधिक वाढल्या होत्या.

24 जानेवारी रोजी करंजी येथून उत्तम रायमान चरमळ यांचे मालकीचा महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर तर 25 जानेवारीला कोळपेवाडी शिवारातून महेंद्र दिपक कोळपे यांचे मालकीचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर असे दोन दिवसात दोन ट्रॅक्टर राहत्या घरासमोरून चोरीला गेले होते.वारंवार तक्रारी येत असल्यामुळे पोलिसही चिंतेत होते. काही लोकांचा संशय आल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली.
सदर गुन्हयाचा तपास सुरु असताना संजय सातव, उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मंगेश सुदाम वर्पे (रा. कनोली, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) व त्यांचे साथीदारांनी हे गुन्हे केले आहे. चोरी केले ट्रॅक्टर हे फायनान्स कंपनीचे असल्याचे सांगून विक्री करतात.

चोरीचे ट्रॅक्टर विकण्यासाठी मंगेश सुदाम वर्पे (रा. कनोली, ता. संगमनेर, जि. नगर) व अतुल सखाराम घुले (रा. संगमनेर, ता. संगमनेर) तालुक्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून तिघांना पकडले परंतु संधीचा फायदा घेत तिघे पसार झाले.  पकडलेल्या आरोपींकडे गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे इतर साथीदारासह ट्रॅक्टर चोरी केलेबाबत तसेच ते शेतकर्‍यांना फायनान्स कंपनीचे असल्याचे सांगून विक्री करणार असलेची कबुली दिली आहे.

यातील दोघांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.  पोलिस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड, उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे तपास पथकातील पोहे कॉ. इरफान शेख, पोलिस नाईक अशोक शिंदे, कृष्णा कुन्हे, सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक फुरखान शेख, प्रमोद जाधव, तपासी अंमलदार पोहेकॉ निजाम शेख, पोना कोकाटे यांनी ही कामगिरी बजावली.

उर्वरीत तिघा पसार आरोपींचा शोध सुरू असून या टोळीत अजून कोण आहे? प्रमुख सूत्रधार व इतर अजून त्यात कोण सामील आहेत. याबाबत तपास सुरू आहे, असे सातव यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी व शेतीशी संबंधित विद्युत मोटारी ट्रॅक्टर व अवजारांच्या चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे आम्ही याकडे लक्ष केंद्रित केले असल्यामुळे आम्हाला तातडीने या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले. अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांनी दिली.

पोलिसांनी हस्तगत केलेला मुद्देमाल
कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी लाख 50 हजार रुपये किमतीचा एक महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर , पिपळगांव बसवंत (नाशिक) येथून 4 लाख रुपये किमतीचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर, 1 लाख 70 हजार रुपये किमतीचा एक महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर, संगमनेर येथून चार लाख रुपये किमतीचा जॉन डिअर कंपनीचा हिरवे रंगाचा ट्रॅक्टर, असे एकूण 12 लाख 20 हजार रुपये किमतीचे चार ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहेत.

Back to top button