नगर : मनोहर पोटेंचा शिवसेना प्रवेश रोखला | पुढारी

नगर : मनोहर पोटेंचा शिवसेना प्रवेश रोखला

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही महिन्यापासून नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी हालचाली सुरू होत्या. मात्र, पोटे यांचा हा पक्षप्रवेश शिंदे गटात आधीच दाखल झालेल्या नगरसेवकांनी रोखला.अर्थात हा प्रवेश रोखण्यासाठी दि.14 रोजी मुंबईत उशिरापर्यत घडामोडी घडल्या. लोकनियुक्त नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्या पदावर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

त्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या’हातात’ असल्याने ही अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी पोटे बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती समजते. त्यासाठी पोटे यांनी नगर जिल्ह्यातील एका नेत्यामार्फत प्रवेशासाठी प्रयत्नशील होते. त्याच पार्श्वभूमीवर काल(दि.14) रात्री उशिरा मनोहर पोटे शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. परंतु, याची आधीच माहिती असल्याने नगरसेवकांनी मुंबई गाठली होती.

श्रीगोंद्याचा ’विषय’ खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे असल्याने त्यांनी पोटे यांच्या प्रवेशाबाबत नगरसेवकांची मते जाणून घेतली. पोटेंच्या प्रवेशाला नगरसेवकांनी तीव्र विरोध केल्याने पोटेंचा प्रवेश रखडल्याची माहिती मिळाली. पोटे यांचा प्रवेश रोखण्याच्या प्रक्रियेत शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद आणि काष्टीचे सरपंच साजन पाचपुते यांनी महत्वाची भूमिका बजावली.

मुख्यमंत्र्यांची कामांसाठी भेट
दरम्यान, मनोहर पोटे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कामानिमित्त भेट घेतली. त्यामागे प्रवेशाचा हेतू नव्हता.

Back to top button