नगर : सुपारी कांडप कारखाने दिवसभर बंद ! | पुढारी

नगर : सुपारी कांडप कारखाने दिवसभर बंद !

शेवगाव तालुका : वृत्तसेवा : शेवगावच्या सुपारी, माव्याची व्याप्ती संपूर्ण राज्यात वाढली आहे. या संदर्भात दैनिक ‘पुढारी’ने शेवगाव बनले माव नगर’ या मथळ्या खाली वृत्त प्रकाशित केले. परिणामी सुपारी कांडप कारखान्यांनी आज दिवसभर कारखाने बंद ठेऊन संबंधित प्रशासन व यंत्रणेचा धांडोळा घेतला. मात्र, पोलिस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन ढिम्मच होते. त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.  शेवगावाची सुपारी, मावा थेट मुंबईपर्यंतच्या ग्राहकांच्या पसंतीस उतरला असून, राज्यातील अनेक जिल्हे माव्याने व्यापले आहेत. कांडप केलेली सुपारी मळून मावा तयार करताना त्यात काही वेदनाशामक औषधे, नशीले पदार्थांचा वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

अशा घातक रसायनांचा वापर करून ग्राहक व नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार राजरोस सुरू असताना पोलिस व अन्न भेसळ प्रशासन मात्र अजुनही सुस्तच असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालून युवा पिढीला बरबाद करणार्‍या या मावानिर्मिती व विक्रीचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

शेवगाव शहरात परिसरातील उपनगरात, वस्तीवर मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या सुपारी कांडप करणार्‍या गिरण्या सुरू आहेत. त्यातून तयार होणार्‍या मालाची थप्पी गोडाऊनमध्ये लपवली जाते. हा सुपारीचा बफर स्टॉक एखाद्या कृषी मालाच्या बाजारपेठेला लाजवणारा आहे. तालुक्यातून थेट राज्यात याचा पुरवठा होत असल्याने दररोज लाखोंची उलाढाल होते. सुपारी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात पाठवली जाते. या व्यसनाच्या विळख्यात सापडून अनेक तरूण, त्यांचे कुटुंब बरबाद झाल्याने याच्या आहारी गेलेल्या व्यसनी तरुणांचे माता-पिता हतबल झाले आहेत.

मावा मिश्रण शरीराला घातक ठरणारे आहे. टपरीवर मावा घेण्यास आलेल्या ग्राहकांमध्ये पोलिस, शिक्षक, शासकीय कर्मचारी, व्यावसायिक, असे सर्वस्तरातील नागरिक असल्याने याची व्याप्ती लक्षात येते. वर्दळीचे रस्ते, सरकारी, निमसरकारी कार्यालये, बँका, यांच्या फरशी, भिंतींवर माव्याच्या पिचकार्‍यांनी नवाच लालसर तपकिरी रंग चढल्याचे दिसून येते. या व्यसनाची व्याप्ती एवढी व्यापक असताना राजरोसपणे सुरू असलेल्या या व्यवसायाकडे अद्यापही पोलिस आणि अन्न भेसळ प्रशासनाची वक्रदृष्टी पडलेली नाही. त्यामुळे यामागील गौडबंगाल समजण्यास मार्ग नाही.

Back to top button