नगर :  स्थायी सदस्यपदासाठी मोर्चेबांधणी ; आठ सदस्य निवृत्त होणार | पुढारी

नगर :  स्थायी सदस्यपदासाठी मोर्चेबांधणी ; आठ सदस्य निवृत्त होणार

नगर :  पुढारी वृत्तसेवा : महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने ते सदस्य निवृत्त होणार आहेत. तर, त्यांच्या जागी पुन्हा नव्याने आठ सदस्य निवडले जाणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षातील नगरसेवकांनी समिती सदस्यपदसाठी देव पाण्यात ठेवले आहेत. स्थायी समिती हा महापालिकेचा आत्मा समजला जातो. त्यामुळे स्थायी समिती सदस्य होण्यासाठी अनेकांचे स्वप्न असते. स्थायीचे सदसत्व मिळाल्यानंतर प्रभागात मोठी कामे करतात येतात आणि त्यासाठी निधीही आणता येतो, अशी नगरसेवकांची धारणा आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड होणे नगरसेवकांसाठी लकी समजले जाते.

महापालिकेत स्थायी समितीसाठी 16 सदस्य आहेत. त्यातील आठ सदस्यांचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने ते निवृत्त होणार आहेत. तर, नव्याने आठ सदस्यांची निवड होणार आहे. सध्या स्थायी समितीत राष्ट्रवादी पाच, भाजप चार, शिवसेना पाच, काँग्रेस एक, बसपा एक अशी सदस्य संख्या आहेत. त्यातील राष्ट्रवादी दोन, भाजप दोन, शिवसेना तीन, बसपा एक असे सदस्य निवृत्त होणार आहेत.
दरम्यान, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे. त्यात नवनियुक्त स्थायी समिती सदस्यांची निवड होणार आहे.

प्रत्येक पक्षाचा गटनेते बंद लिफाफ्यात आपल्या पक्षाच्या सदस्यांची नावे महापौरांकडे देणार असून, त्यानंतर महापौर सदस्यांची नावे घोषित करणार आहेत. महापौरांनी सदस्यांच्या निवडी घोषित केल्यानंतर स्थायी समिती सदस्यांची नावे व सभापती पदाच्या निवडीसाठीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला जाणार आहे. विभागीय आयुक्तांकडून सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

हे होणार निवृत्त
रिता भाकरे, नगरसेवक परशुराम गायवाकड, सचिन शिंदे (शिवसेना), नगरसेविका मीनाताई चव्हाण, नगरसेवक समद खान(राष्ट्रवादी), नगरसेविका वंदना ताठे, नगरसेवक रवींद्र बारस्कर (भाजप), नगरसेवक मुद्दसर शेख (बसपा).

हे राहणार कार्यरत
कुमारसिंह वाकळे, विनीत पाऊलबुद्धे, ज्योती गाडे (राष्ट्रवादी), गौरी नन्नवरे, राहुल कांबळे(भाजप), उमेश कवडे, मंगल लोखंडे(शिवसेना), रुपाली वारे(काँग्रेस)

Back to top button