नगर : मोबाईल स्विच ऑफ… गिरणी बंद… १८ तास विजेअभावी नगरकरांचे हाल बेहाल | पुढारी

नगर : मोबाईल स्विच ऑफ... गिरणी बंद... १८ तास विजेअभावी नगरकरांचे हाल बेहाल

नगर : पुढारी वृत्तसेवा :  खासगीकरणाविरोधात महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कर्मचारी-अधिकार्‍यांचा संप सुरू होताच रात्री बाराच्या ठोक्याला वीज पुरवठा खंडीत झाला. परिणामी मंगळवारीची रात्र नगरकरांना रात्र अंधारात काढावी लागली. रुग्णालय, सरकारी कार्यालये, नोकरदार व्यापारी आणि गृहिनींना त्याचा फटका बसला. लाईट नसल्याने अनेकांची घालमेल झाली.

राज्य सरकारकडून भांडूप परिक्षेत्र खासगी तत्त्वावर देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा निषेध म्हणून महावितरण कर्मचारी व अभियंता संघटनेतर्फे मंगळवारी मध्यरात्रीपासून 72 तासांचा संप पुकारला होता. रात्री साडेबारापासून संपाला सुरूवात होताच नगर शहरातील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडीत झाला. बुधवारी सायंकाळपर्यंत वीज गायब होती. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. सकाळी उठल्यानंतर अनेकांचा अंघोळीसाठी पाणी तापविण्याचा खोळंबा झाला. मसाले काढण्यासाठी महिलांनी पाटावरूठा, खलबत्त्याचा आधार घेतला. रुग्णालयांनाही त्याचा फटका बसला. दरम्यान, बुधवारी सायंकाळी उशिराने वीज पुरवठा सुरूळीत झाला.

शहरातील अनेक घरामध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तत्काळ वीज मिळावी म्हणून इनर्व्हटरचा वापर केला जातो. मंगळवारी मध्यरात्री वीज गेल्यानंतर बुधवारी सायंकाळपर्यंत वीज गायब होती. परिणामी अनेकांचा घरातील इनर्व्हटर डिर्चाज झाला.

मोबाईल स्वीचऑफ

महावितरण कर्मचार्‍यांच्या संपामुळे रात्रीच वीज पुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत काम करणार्‍यांचा मोबाईल बुधवारी दुपारपर्यंत चार्ज झाले नाही. परिणाम सतत मोबाईलमध्ये डोके घालणार्‍यांचा मोबाईल स्वीचअ‍ॅप झाल्याने खोळंबा झाला.

पीठ संपल,  गिरणी बंद
महावितरण कर्मचार्‍यांनी अचानक संप पुकारला. संपाची वेळी मध्यरात्रीची असल्याने नागरिकांचा पुरेसा सावधगिरी बाळगता आली नाही. संपाची नागरिकांना कल्पना असती तर दळण दुळून आणणे, कपडे वाशिंग करणे अशी विजेवरची कामे नागरिकांनी अगोदर केली असती. पण, अचानक संप पुकारल्याने नागरिकांची अडचण झाली.

अत्यावश्यक सेवांवर परिणाम

वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, हॉस्पिटल, शाळा, मेडिकल अशा अत्यावश्यक सेवा पुरविण्यात अडचणी निर्माण झाल्या.

शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प

नगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसील व इतर कार्यालयांत दिवसभर वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे सरकारी कामकाज दिवसभर ठप्प होते. याचा फटका बाहेर गावांहून आलेल्या नागरिकांना बसला आहे. पदवीधर निवडणुकीचे कामकाजाला अडथळा निर्माण झाला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयातील लिप्ट बंद असल्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांची चांगलीच दमछाक झाली.

जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्वच कार्यालयांत संगणकप्रणालीचा वापर केला जात आहे. अनेक ठिकाणी ऑनलाईन सेवा उपलब्ध आहेत. वीजच गूल झाल्यामुळे सर्वच सेवा निकामी झाल्या. पदवीधर निवडणुकीचे कामकाजाला अडथळा निर्माण झाला. एकंदरीत कार्यालयीन कामकाज जवळपास ठप्पच होते. मात्र, अशा परिस्थितीत नियोजनाप्रमाणे अधिकारी यांच्या बैठका सुरु होत्या. लोकप्रतिनिधी व इतरांचे निवेदने स्वीकारण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयाची सात मजली, जिल्हा परिषद कार्यालयाच्या पाच मजली इमारतींचे सर्वच लिफ्ट बंद होते. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांना जिन्याचा वापर करावा लागला. सवय नसल्यामुळे बहुतांश अधिकारी व कर्मचार्‍यांची दमछाक झाली. काही कार्यालयांत जनरेटरचा वापर करुन, थोडेफार कामकाज मार्गी लावण्याचा प्रयत्न झाला.

नगरचा पाणीपुरवठा विस्कळीत

वीज वितरण कंपनी कर्मचार्‍यांच्या संपामुळे जामखेड, नेवासा व भिंगार येथील वीज उपकेंद्र बंद झाल्याने शहरातील पाणी योजनेचा खोळंबा झाला. परिणामी शहरातील सर्वच भागाचा पाणीपुरवठा विस्कळित झाला. महावितरण कर्मचार्‍यांना वारंवार विनंती केल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता वीजपुरवठा सुरू झाला. मंगळवारी रात्रीपासून वसंत टेकडी येथे येणारा पाणीपुरवठा बंद राहिला. त्यामुळे उपनगर भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. सलग दहा तास वीजपुरवठा बंद राहिल्याने वसंत टेकडी येथील उपनगर भागासाठी पाणी वाटप करिताची उंच टाकी व शहराच्या मध्यवर्ती भागासाठी पाणीपुरवठा होत असलेली आरटीओ व सरोष उंच पाण्याच्या टाक्या भरता आलेल्या नाहीत.

तसेच, वसंत टेकडी येथून थेट विद्युत मोटरीद्वारे पाणीपुरवठा होत असलेल्या निर्मलनगर, लक्ष्मीनगर, तपोवन रोड परिसर, सूर्यनगर, मुकुंदनगर उपनगर भागाकरिताच्या कार्यरत मोटरीद्वारे वीजपुरवठ्याअभावी होणारा पाणी उपसा बंद होता. परिणामी बुधवारी (दि. 4) रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास कोठला, मंगलगेट, झेडीगेट, दाळमंडई, रामचंद्रखुंट, काळुबागवान गल्ली, धर्ती चौक, माळीवाडा, कोठी, कलेक्टर कचेरी परिसर या भागासह गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हडको, प्रेमदान हडको, टिव्ही सेंटर हडको, लाईट बिशप कॉलनी परिसरात पाणीपुरवठा करता आलेली नाही. या भागातील पाणीपुरवठा हा गुरूवारी (दि. 5) करण्यात येईल.

गुरुवारी (दि. 5) रोटेशननुसार पाणीवाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास सिद्धार्थ नगर, सर्जेपुरा, तोफखाना, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, खिस्त गल्ली, आनंदीबाजार, कापडबाजार माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर व सावेडी परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार असून या भागास गुरुवारऐवजी शुक्रवारी (दि. 6) करण्यात येणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.

 

Back to top button