नगरच्या पाच शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्कार ! | पुढारी

नगरच्या पाच शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्कार !

नगर : पुढारी वृत्तसेवा : क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव हे राज्यस्तरीय पुरस्कार शासनाने नुकतेच जाहीर केले आहेत. यामध्ये नगर जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिकमधील सर्वाधिक पाच शिक्षकांना हे पुरस्कार जाहीर झाले आहे. राज्य शिक्षक पुरस्कार योजना 1962-63 पासून महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित असून, ती शालेय शिक्षण विभागांमार्फत राबविली जाते. सन 2021-22 पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून हे पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविण्यात येत आहे.

सन 2021-22 च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी दि. 1 सप्टेंबर 2022 रोजी राज्य निवड समितीची ऑनलाईन बैठक झाली. राज्य निवड समितीने 5 सप्टेंबर 2022 च्या पत्रान्वये शिक्षकांची गुणानुक्रमे प्रवर्गनिहाय निवड यादी शासनास सादर केली. त्यानुसार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार घोषित करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर प्रवर्गनिहाय 108 शिक्षकांची निवड केली आहे.

यात नगरचे प्राथमिकचे तीन आणि माध्यमिकच्या दोन शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे जि.प. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, राजश्री घुले, मिराताई शेटे, राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे, काशीनाथ दाते, संदेश कार्ले यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त सीईओ संभाजी लांगोरे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्राथमिकचे भास्कर पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

पुरस्कार प्राप्त शिक्षक

राज्यातील प्राथमिक शाळांमधून तुकाराम अडसूळ ( जि.प. शाळा गीतेवाडी, पाथर्डी), माध्यमिक विद्यालयांतून स्वाती अहिरे (जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळाचे माध्यमिक विद्यालय, चास), आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ठ काम असल्याबद्दल दीपक बोर्‍हाडे ( विठे, जि.प. शाळा, अकोले), विशेष शिक्षक (कला) पुरस्कार संदीप चव्हाण (रयतचे कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालय करंजी) आणि शिक्षक गाईड पुरस्कार हा मंगला साळुंके (न्यू इंग्रजी स्कूल, पारनेर) असे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

 

Back to top button