नेवासा : ‘आमदार शंकरराव गडाख’हाच माझा पक्ष : नगरसेवक फारूक आतार | पुढारी

नेवासा : ‘आमदार शंकरराव गडाख’हाच माझा पक्ष : नगरसेवक फारूक आतार

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  संपूर्ण नेवासा शहराच्या विकासासाठी अहोरात्र झटणार्‍या व नेवासा तालुक्यासाठी सर्वाधिक निधी आणून तालुक्याचा कायापालट करणारे आमदार शंकरराव गडाख हाच माझा पक्ष आहे, असे सांगत नगरसेवक फारूक आतार यांनी नेवासा शहरात चालू असलेल्या नगरसेवक फुटीच्या उंबरठ्यावर या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. नगरसेवक आतार यांनी आमदार गडाख यांनी नेवासा नगरपंचायत हद्दीत व नेवासा तालुक्यात केलेल्या कोट्यवधींच्या विकास कामांची यादीच जनतेसमोर वाचून दाखवली. तसेच आजपर्यंत नगरपंचायतीसाठी आमदार गडाख यांनी मोठ्या प्रमाणावर विकासनिधी आणला आहे. नेवासा शहर विकासाचे काम आपल्या आमदारांनी करून दाखवले आहे. त्यामुळेच त्यांची विकासाचा महामेरू म्हणून ओळख आहे. तसेच वैयक्तिक माझ्या नगरपंचायत प्रभागात मी गेली पाच वर्षे नगरसेवक म्हणून काम करीत आहे. या पाच वर्षात माझ्या प्रभागात आमदार गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रयत्नाने कोट्यवधींची विकासकामे झाली आहेत.

तसेच नेवासा शहरातही मोठ्या प्रमाणावर विकासकामे आमदार गडाख यांच्या प्रयत्नांनी पूूर्णत्वास येत आहे. म्हणूनच या विकासाच्या महामेरू सोबत शहरातील व तालुक्यातील नागरिक सदैव आहेत. शहरातील प्रत्येक नागरिकाच्या चेहर्‍यावर आमदार गडाख यांच्या प्रयत्नांमुळे झालेल्या कामाबाबत समाधानही आहे. गेल्या काही दिवसांपासून कुणाच्यातरी प्रलोभनामुळे मी विरोधी गटात प्रवेश करणार अशा चर्चा शहरात सुरू होत्या.

या सर्व चर्चेचे मी खंडन करतो व शेवटच्या क्षणापर्यंत आमदार गडाख यांच्या बरोबरच एकनिष्ठ राहणार आहे. आमदार गडाख यांना मानणारा एक सच्चा आणि एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. माझी ओळखच आमदार शंकरराव गडाख यांच्यामुळे आहे.
शहर व परिसरात आमदार गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीही सक्रिय होतो व यापुढेही सदैव सक्रिय राहून तन, मन, धनाने जनतेची सेवा करणार आहे. आमदार गडाख हेच माझे दैवत व नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली सदैव काम करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे आतार यांनी स्पष्ट केले.

Back to top button