नगर : घरकुल योजनेचे चाक रुतलेलेच; तीन वेळा निविदा प्रसिद्ध करूनही ठेकेदार मिळेना | पुढारी

नगर : घरकुल योजनेचे चाक रुतलेलेच; तीन वेळा निविदा प्रसिद्ध करूनही ठेकेदार मिळेना

सूर्यकांत वरकड

नगर : शहरात केडगाव, नालेगाव, आगरकर मळा, संजयनगर येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल प्रकल्प उभे राहात आहेत. लाभार्थ्यांचा बुकिंगसाठी थंड प्रतिसाद मिळत आहे. वेळेत काम पूर्ण होत नसल्याने 44 पैकी 21 लाभार्थ्यांनी बुकिंगची रक्कम परत केली तर ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आगरकर मळ्यातील प्रकल्पाची तीन वेळा निविदा प्रसिद्ध करून कोणीही ठेकेदार मिळेना. त्यामुळे शासनाचा महत्त्वाकांशी प्रकल्प तांत्रिक अडचणीत सापडला आहे.

महापालिका हद्दीत नालेगाव 216, केडगाव 624 सदनिकांची पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल उभारले जात आहे. या दोन्ही प्रकल्पासाठी सुमारे 76 कोटींचा निधी मंजूर आहे. या घरकुल योजनेसाठी वर्षभरापूर्वी अर्ज मागविले होते. हजारोंच्या घरात अर्ज आल्याने सोडत पद्धतीने लाभार्थी निश्चित केले होते. एका घराच्या बुकिंगसाठी एक लाख रुपये भरावे, अशी अट मनपाने घातली होती. मात्र, स्थायी समितीत त्यावर चर्चा होऊन ती अटक 50 हजारांची करण्यात आली. तरीही बुकिंगला प्रतिसाद मिळात नाही.

दरम्यान, आगरकर मळ्यात 594 घरांच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. हा प्रकल्प उभारणीसाठी तीन वेळा निविदा प्रसिद्ध करून एकाही ठेकेदाराने निविदा भरली नाही. आता चौथ्यांना निविदा प्रसिद्धीसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. केडगाव व नालेगाव येथील घरकुल प्रकल्पाचा कार्यरंभ आदेश होऊन दोन वर्ष झाली तरी अद्याप ठेकेदाराने काम सुरू केलेले नाही.

सिमेंट, स्टिल, खडी आदी साहित्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने काम करणे शक्य नसल्याचे ठेकेदाराने कळविले आहे. या दोन्ही गृहप्रकल्पाचे काम करणार्‍या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पुन्हा निविदा प्रसिद्धीसाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पातील 44 पैकी 21 लाभार्थ्यांनी बुकिंगची रक्कम परत घेतली आहे.

केडगाव घरकुल प्रकल्प
मंजुरी : एप्रिल 2018
कार्यरंभ : 18 सप्टेंबर 2019
इमारती : 26
सदनिका : 624
एका सदनिकेचा खर्च : 8 लाख 94 हजार
एकूण प्रकल्प खर्च : 46 कोटी 32 लाख 31 हजार

आगरकरमळा घरकुल प्रकल्प
मंजुरी : 21 नोव्हेंबर 2019
कार्यरंभ : दोन वेळा निविदा प्रसिद्ध
इमारती : 22
सदनिका : 594
एका सदनिकेचा खर्च : 11 लाख
एकूण प्रकल्प खर्च : 65 कोटी 21 लाख 92 हजार

नालेगाव घरकुल प्रकल्प
मंजुरी : एप्रिल 2018
कार्यरंभ : 18 सप्टेंबर 2019
इमारती : 09
सदनिका : 216
एका सदनिकेचा खर्च : 9 लाख 90 हजार
एकूण प्रकल्प खर्च : 19 कोटी 47 लाख 19 हजार

संजयनगर घरकुल प्रकल्प
मंजुरी 26 सप्टेंबर 2018
कार्यरंभ आदेश ः 1 नोव्हेंबर 2019
इमारती ः 7
सदानिका ः 298
एका सदनिकेचा खर्च ः 8 लाख 94 हजार
एकूण प्रकल्प खर्च ः 18 कोटी 81 लाख 56 हजार

संजयनगरचे काम जोरात
शहरामध्ये संजयनगरमध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 298 सदनिकाचा घरकुल प्रकल्प आहे. त्यात सात इमारती आहेत. त्यातील एक इमारतीचे काम पूर्ण झाले असून, 33 सदनिकामध्ये लाभार्थ्यांचे स्थालंतर सुरू आहे. लाभार्थ्यांचे स्थलांतर झाल्यानंतर पुन्हा नव्याने दुसर्‍या इमारतीचे काम सुरू करण्यात येणा आहे. त्या 33 सदानिकाचा राज्य शासनाचा हिस्सा 13 लाख 20 हजार रुपये प्राप्त झाला आहे. तर, केंद्र सरकारचेही निधी प्राप्त झाला आहे.

केडगाव व नालेगाव येथील पंतप्रधान आवास योजनेच्या गृहप्रकल्पाचे काम ठेकेदाराने वेळेत न केल्याने त्याचा ठेका रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर, आगरकर मळ्यातील गृहप्रकल्पाची चौथ्यांदा निविदेचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

                                                                           – गणेश गाडळकर,
                                                                         प्रकल्प प्रमुख, मनपा

Back to top button