पुणे-नाशिक महामार्गावर खड्ड्यांची मालिका | पुढारी

पुणे-नाशिक महामार्गावर खड्ड्यांची मालिका

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरती पावसामुळे मोठाले खड्डे पडले आहेत. या खड्डयांमुळे अनेक निष्पापांचा बळी गेला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी होऊन जायबंदी झाले आहे. मात्र याचे साधे सोयर सुतकही टोल प्लाझा आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाला राहिलेले नाही. अजून तरी या मृत्यू घंटा समजल्या जाणार्‍या या राष्ट्रीय महामार्गावर अजून किती जणांचा बळी जाण्याची वाट टोल प्लाझा कंपनी पाहत आहे का? असा संतप्त सवाल वाहनचालकांमधून व्यक्त केला जात आहे. पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असणार्‍या घारगाव, बोटा, डोळासने, साकुर फाटा, चंदनापुरी घाट, संगमनेर बायपास या ठिकाणी अनेक वेळा अपघात होऊन अनेक निष्पाप नागरिकांना आपला गमवावे लागले.

तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहेत. कर्‍हे घाट ते आळे फाटा या दरम्यान महामार्गावरती ठिक- ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे या महामार्गात वरील खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक वेळा वाहनचालकांकडून अपघात सुद्धा झालेले आहेत. तरी सुद्धा टोल प्लाझा कंपनीच्या प्रशासनाचे या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत फक्त टोल वसुलीकरण्यातच मग्न असल्याचा आरोप या वाहन चालकामधून होत आहे.

पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीसह रात्रीचे पेट्रोलिंग करणे, अपघात झाला तर तात्काळ घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवून जखमींना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करणे तसेच महामार्गावरून अपघातग्रस्त वाहन बाजूला घेण्यासाठी क्रेन उपलब्ध करून देणे आदी कामे टोल प्लाझा प्रशासनाचे आहे.

दोन दिवसांपूर्वी याच महामार्गाने प्रवास करणारे ओझर येथील तरुण उद्योजक जयवंत रवींद्र शिंदे यांची कार महामार्गा वरती पडलेल्या खड्ड्यातून उडून थेट शेतात गेली आणि ते गंभीर स्वरूपामध्ये जखमी झाले. मात्र ही बाब टोल प्लाझा कंपनीला फोनवरून कळवून सुद्धा त्यांनी फोन न उचलता साधी रुग्णवाहिका ही पाठविण्याची साधी तसदी सुद्धा टोल कंपनीने घेतली नाही. त्यामुळे शिंदे यांना सुमारे चार ते पाच तास अपघातग्रस्तच वाहनातच जखमी अवस्थेत पडून राहावे लागण्याची वेळ आली. त्यामुळे टोल कंपनीच्या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांच्याबाबत वारंवार टोल प्लाझा प्रशासनाला निवेदने देऊन सुद्धा कुठलीही दखल घेतली जात नाही. जर महामार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती झाली नाही तर कुठल्याही क्षणी आंदोलन केले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजन शिंदे यांनी दिला आहे. दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आज आंदोलन करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी युवकचे आज आंदोलन
पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडले आहेत. तरीही टोल प्लाझा कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग रस्ता दुरुस्ती करण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे संगमनेर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली टोल प्लाझा कंपनीच्या आज (दि. 4) कंपनीच्या विरोधात आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय भालेराव, राहुल वर्पे व विकी पवार यांनी दिला आहे.

Back to top button