संगमनेरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, अकरा जणांना अटक | पुढारी

संगमनेरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, अकरा जणांना अटक

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील इंदिरानगर परिसरात एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी सव्वा लाखाच्या रोकडेसह साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी पोलिस पथकाने 11 जणांना ताब्यात घेतले. नंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. पोलिसांनी सांगितले की, शहरातुन जाणार्‍या पुणे- नाशिक मार्गावर जय जवान चौकालगत हॉटेल लकी शेजारी इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर हार- जीत हा जुगार अड्डा चालू असल्याची माहिती गुप्ता खबर्‍यामार्फत तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी पो. नि. सुनील पाटील यांना समजली. त्यांनी तत्काळ पथकासह छापा टाकला असता, 11 जण हार-जीतचा खेळ खेळत असल्याचे पोलिस पथकास आढळले.

पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडून त्यांच्याकडून 1 लाख 21,500 रोकड, 3 लाख किंमतीची मारुती स्विफ्ट, 1 लाख 20 हजार रुपयाच्या तीन मोटार सायकल असा एकूण 5 लाख 47, 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याबाबत संगमनेर शहर पोलिस ठाण्यात संगमनेर तालुका पोलिस ठाणे येथील पोलिस कॉन्स्टेबल यमुना जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहरातील 11 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून, त्यांना ताब्यात घेतले. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, अचानक पडलेल्या या छाप्यामुळे शहरातील जुगार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाल्याची चर्चा झडत आहे.

Back to top button