राहुरी : कॉलेजमधील तरुणीची छेडछाड; तिघांना पोक्सो | पुढारी

राहुरी : कॉलेजमधील तरुणीची छेडछाड; तिघांना पोक्सो

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : महाविद्यालयीन तरुणीची छेडछाड करणार्‍या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याचा विडा पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी उचलून आज तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे कॉलेज तरूणीची छेडछाड काढणार्‍या तिघा रोडरोमिओंविरुद्ध विनयभंग व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा  दाखल केला आहे. दरम्यान, या कारवाईमुळे रोडरोमिओंमध्ये दहशत पसरली आहे.  रविवारी (दि. 24) सकाळी साडेसात वाजे दरम्यान 17 वर्षे 7 महिने वयाची कॉलेज तरूणी क्लास सुटल्याने सायकलवरून घरी जात होती. यावेळी स्कूटी गाडीवर तिघेजण सायकलच्या पुढे आले. गोल चक्कर मारून त्या मुलीला हाताने हातवारे करीत पुन्हा मागे निघून गेले.

ते तिघेजण काही वेळातच परत आले. त्यावेळी त्यांच्यापैकी राहुल ऊर्फ काळ्या याने त्या मुलीची सायकल ओढून तिचा हात धरला. तिला म्हणाला, ‘तू मला फार आवडते, तू माझ्या बरोबर चल,’ असे म्हणत त्याने मुलीला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. अविनाश धोत्रे हा मोटारसायकल उभी करून या मुलीजवळ आला. तिचा हात धरून तिला मोटारसायकलकडे घेऊन जाऊ लागला. त्याचवेळी रोंग्या ऊर्फ बाबासाहेब पवार हा तिच्या अंगावरील जर्किन ओढू लागला. यावेळी मुलीने आरडाओरडा केला असता, तेथे इतर लोकं जमा होऊ लागले. हे पाहून ते तिघेजण पसार झाले. या घटनेनंतर कॉलेज तरूणीने आई- वडिलासोबत राहुरी पोलिस ठाणे गाठले. कॉलेज तरूणीच्या फिर्यादीवरून राहुल ऊर्फ काळ्या, अविनाश नवनाथ धोत्रे, रोंग्या ऊर्फ बाबासाहेब पवार (तिघे रा. देवळाली प्रवरा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button