शिक्षक बँक सभेत उद्या घमासान ! वार्षिक सभेला निवडणुकीची झालर | पुढारी

शिक्षक बँक सभेत उद्या घमासान ! वार्षिक सभेला निवडणुकीची झालर

नगर : पुढारी वृत्तसेवा :  दहा हजार शिक्षकांच्या जिव्हाळ्याची शिक्षक बँकेचे राजकारण उद्यापासून पुन्हा एकदा तापणार आहे. रविवारी (दि.18) बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. तर, दुसर्‍या दिवशी 19 सप्टेंबरला न्यायालयीन सुनावणीत स्थगित झालेल्या निवडणुकीची नवीन तारीख निश्चित होण्याची शक्यता आहेे.  शिक्षक बँकेची निवडणूक प्रक्रिया थांबलेली आहे. तत्पूर्वी सत्ताधारी गटाचे नेते बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वात गुरुमाऊली, डॉ. संजय कळमकर यांचे गुरुकुल, रोहोकले गुरुजींचे गुरुमाऊली, आणि राजेंद्र शिंदे यांचे सदिच्छा मंडळ हे समविचारी संघटनांना सोबत घेऊन निवडणूक आखाड्यात उतरलेले आहे. यात, उमेदवारी न मिळाल्याने घडलेले नाराजीनाट्य, त्यातून मनधरणी, फोडाफोडी, सभा-बैठकांसह रात्रीची भोजनावळी इत्यादी घडामोडींमुळे ही निवडणूक रंगात आली होती. 24 जुलैला मतदानही ठरले होते. मात्र, शासनाच्या 15 जुलैच्या एका निर्णयाने ही निवडणूक ‘आहे त्या टप्प्यावर’ थांबवावी लागली. त्यावर तांबे गट न्यायालयात गेला. त्यावर सुनावणी सुरू आहे. त्यानंतर आता 19 सप्टेंबरला होणार्‍या सुनावणीत निवडणुकीची तारीख निश्चित होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, महिनाभर थंडावलेले शिक्षकांचे राजकारण पुन्हा तापू लागले आहे. त्यातच रविवारी होणारी वार्षिक सभा ही विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. तर, सत्ताधार्‍यांनाही विरोधकांच्या आरोपांचे खंडण करून सभासदांसमोर आरसा मांडण्याची ही संधी आहे.
दरम्यान, या सभेत सत्ताधारी गुरुमाऊलीला घेरण्यासाठी विरोधी रोहोकले गट, गुरुकुल आणि सदिच्छाने जणू ‘चक्रव्यूह’ रचले आहे.तर, सत्ताधारी गटाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी हे चक्रव्यूह भेदण्यासाठी विरोधकांचे ‘बाड’ आणि सभासद हिताच्या कामांची यादी एक शस्त्र म्हणून तयार ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे उद्या होणारी ही सभा चांगलीच गाजणार आहे. या सभेमध्ये प्रवास भत्ता, घड्याळ खरेदी, नफा वाटणी इत्यादी विषयांवर वादळी चर्चा होण्याचे संकेत आहे.

‘गुरुमाऊली’कडून निराशा : नरसाळे
सत्ताधार्‍यांनी जो काही चुकीचा कारभार केला, याविषयी सभेत सभासदांसमोरच आम्ही त्यांना शांततेच्या मार्गाने जाब विचारणार आहोत. दोन्ही गुरुमाऊली आज जरी स्वार्थासाठी वेगळे झाले असले, तरी त्यांनीच वेळोवेळी हातमिळवणी करून सत्ता भोगली आहे. त्यामुळे तांबे व रोहोकले गटाने सभासदांना उत्तरे द्यावीत. यावेळीही गुरुकुल सभासदांसोबत असेल, असे गुरुकुलचे भास्करराव नरसाळे म्हणाले.

अहवालात ‘नफा’ कुठंय : डावखरे
गुरुमाऊलीला शिक्षक बँकेची सत्ता रोहोकले गुरुजींच्या नावामुळे मिळाली. त्यावेळी ज्यांनी मंडळ पाडण्यासाठी पुढाकार घेतला. आज त्यांचे फोटो अहवालात घेतले आहेत. नफा वाटणी टाकलेली नसतानाही सभेची मंजुरी घेण्याचा घाट आहे. प्रवासभत्ता, घड्याळ खरेदी, नफा वाटणी, याबाबत सूज्ञ सभासद जाब विचारणार, असे रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊलीचे विकास डावखरे यांनी सांगितले.

ठेवीतून परस्पर पैसे वळविले : शिंदे
सत्ताधार्‍यांनी सभासदांना दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. नफा वाटणीचा तक्ता अहवालात दिसत नाही. तसेच यांनी सभासदांना न विचारता ठेवीतून परस्पर पैसे लाटण्याचा प्रयत्न केला. विकास मंडळासाठी 100 रुपये असतील किंवा मृत सभासदांच्या ठेवीतून कर्जात रक्कम वर्ग करण्याचा प्रताप असेल, यावर आम्हीही जाब विचारणार असल्याचे ‘सदिच्छा’चे नेते राजेंद्र शिंदे म्हणाले.

सर्व प्रश्नांची उत्तरे देणार : पठाण
शिक्षक बँकेत सत्तेत येण्यापूर्वी काही सत्ताधारी लोकं विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी वार्षिक सभा गुंडाळत होते. मात्र, आम्ही उद्या तसं करणार नाही. काय बोलायचे ते बोलू द्या, त्यांचे प्रश्न संपेपर्यंत आम्ही सभा सोडणार नाहीत. विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्याकडे आहेत. तसेच, विरोधकांचे जुने ‘बाड’ही आहे, असे सत्ताधारी गटाचे संचालक सलीमखान पठाण यांनी स्पष्ट केले

Back to top button