जेऊर परिसरात पुन्हा रोडरोमिओंचा सुळसुळाट | पुढारी

जेऊर परिसरात पुन्हा रोडरोमिओंचा सुळसुळाट

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जेऊर गावात पुन्हा रोडरोमिओंचा सुळसुळाट झाला असून, त्यांच्या बंदोबस्तासाठी ग्रामपंचायतीने एमआयडीसी पोलिसांना निवेदन दिले आहे. रोडरोमिओेंच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. पालक विद्यार्थिनींना शाळेत पाठवावे की नाही, अशा संभ्रमात आहेत. जेऊरमधील विद्यालय परिसर, चौकात रोडरोमिओंनी उच्छाद मांडला आहे. यापूर्वी संबंधित विद्यालय, ग्रामपंचायतीने पोलिसांना निवेदन देऊन कायमस्वरूपी रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यावेळी पोलिस व दिलासा सेलने गस्त घातल्यानंतर रोडरोमिओ गायब झाले होते. परंतु, आता कोरोनानंतर विद्यालय नियमित सुरू झाले. त्यामुळे रोडरोमिओंचा देखील सुळसुळाट वाढला आहे.

विद्यालय भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी रोडरोमिओंकडून विद्यार्थिनींना छेडण्याचे प्रकार होतात. धूमस्टाईल गाडी चालविणे, अश्लिल बोलणे, हावभाव करणे, अपशब्द वापरणे, कट मारणे, पाठलाग करणे, असे प्रकार नित्याचेच झाले आहेत. जेऊरला शिक्षणासाठी बहिरवाडी, इमामपूर, ससेवाडी, चापेवाडी, वाघवाडी, धनगरवाडी, डोंगरगण, पांढरीपूल, तसेच वाड्या-वस्त्यांवरुन विद्यार्थी येतात.
रोडरोमिओंचा दिवसेंदिवस वाढत चाललेला उपद्रव पाहता, वाड्या-वस्त्यांवर जाताना निर्जन, ओसाड रस्ते असल्याने पालकही मुलींना शाळेत पाठविण्याबाबत साशंक झाले आहेत.

रोडरोमिओंचे आपापसात यापूर्वी वाद, हाणामारी देखील झाली आहे. जेऊर व परिसरातील आसपासच्या गावातील, वाड्यातील टपोरी मुलांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. अनेक जण दारूच्या नशेत असतात. रोडरोमिओंचा त्रास होत असला, तरी मुली शाळा बंद होण्याच्या भीतीने त्या तक्रार करत नाहीत. जेऊर परिसरातील रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची तसेच विद्यार्थिनींना शाळेच्या वेळेत संरक्षण देण्याची मागणी जेऊर ग्रामपंचायतीने निवेदनात केली आहे.

चौक बनले रोडरोमिओंचे ‘अड्डे’
जेऊर व विद्यालयाच्या रस्त्यावरील विशिष्ट चौक रोडरोमिओंचे अड्डे बनले आहेत. विद्यालयाच्या वेळेत नशेत, तसेच घोळक्याने उभे राहून त्यांचे उद्योग सुरू आहेत. शिक्षकांना अरेरावीचे प्रकार देखील घडले आहेत. यावरून या रोडरोमिओंच्या उपद्रवाची कल्पना येते.

Back to top button