ओढे, नाले अतिक्रमण मुक्त करणार : खा. डॉ. सुजय विखे पाटील | पुढारी

ओढे, नाले अतिक्रमण मुक्त करणार : खा. डॉ. सुजय विखे पाटील

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : अतिक्रमणातून जुने ओढे, नाले मुक्त करण्याशिवाय पर्याय नसल्याने याबाबत मोहीम राबविली जाणार आहे. कोणाचेही असेल तरीही अतिक्रमण काढण्याच्या सूचना देत, नुकसान झालेल्या घरांचे तातडीने पंचनामे करून नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाच्या निकषाप्रमाणे मदत मिळवून देणार असल्याची ग्वाही खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी शिर्डी आणि परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसाने शहरातील बहुतांश भाग जलमय झाला. पाण्याला प्रवाह न राहिल्याने रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. जनजीवन विस्कळित झाल्याने हवालदिल झालेल्या नागरिकांना खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी दिलासा देत संवाद साधला.

यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, कैलासबापू कोते, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे, शिवाजी गोंदकर, अभय शेळके, नितीन कोते, जगन्नाथ गोंदकर, मंगेश त्रिभुवन, रवींद्र गोंदकर, सुजित गोंदकर, सुधीर शिंदे, दीपक वारुळे, प्रतापराव जगताप, मधुकर कोते, हरिश्चंद्र कोते, रवींद्र कोते, दत्तात्रय कोते, पोपट शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी कनकुरी रोडलगत लेंडी नाल्यासह नांदुर्खी पाटातून येणार्‍या पाण्याची खा. डॉ. विखे यांनी पाहणी केली. लेंडी नाल्याच्या पुरामुळे लक्ष्मीनगर येथे नागरिकांच्या घरांची पाहाणी करून, सर्व नागरिकांना एकसमान मदत देण्यात येईल. धान्य, पिण्याचे पाणी, तसेच नुकसानग्रस्तांना आपत्ती व्यवस्थापनाचे निकष व नियमाप्रमाणे मदत मिळवून देवू, अशी ग्वाही खा. डॉ. विखे यांनी दिली. नागरिकांना सध्या साई आश्रममध्ये स्थलांतरित करुन, त्यांच्या भोजनाची व्यवस्था केल्याचे त्यांनी सांगितले.

तातडीची मदत म्हणून केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजनेतून धान्य देण्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. स्थानिक अधिकार्‍यांच्या समन्वयाने धान्य लवकर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे खा. डॉ. विखे यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करुन, अहवाल आल्यानंतरच मदतीबाबत मार्ग मोकळा होईल, असेही ते नगरपरिषद कार्यालयातील बैठकीत नुकसानीचा आढावा घेताना म्हणाले.

‘ते’ बांधकाम तोडणार!
आता यापुढे कोणाचाही विचार न करता या सर्व ठिकाणची अतिक्रमण किंवा भिंत आठवडाभरात काढून टाकण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यासाठी मोठी मोहीम हाती घ्यावी लागेल. या मोहिमेंतर्गत अनधिकृत बांधकाम तोडून ओढे-नाले अतिक्रमण मुक्त केले जातील. याशिवाय अन्य पर्याय नसल्याचे खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी सर्वांच्या निदर्शनास आणून दिले.

Back to top button