नगर : जळीत ‘आयसीयू’ अजूनही व्हेंटिलेटरवरच! | पुढारी

नगर : जळीत ‘आयसीयू’ अजूनही व्हेंटिलेटरवरच!

नगर, गोरक्षनाथ शेजूळ : नोव्हेंबर 2021 मध्ये जिल्हा रुग्णालयातील आयसीयूला आग लागून निष्पाप 16 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेला नऊ महिने उलटल्यानंतरही ‘तो’ आयसीयू अजूनही बंद आहे. जिल्हा रुग्णालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवित असले तरी दोन्ही विभागाच्या दिरंगाईमुळे ‘आयसीयू’ अजूनही प्रशासकीयदृष्ट्या अत्यवस्थच असल्याची माहिती समोर आली आहे.

नोव्हेंबर 2021 च्या पहिल्या आठवड्यात जिल्हा रुग्णालयात आगीचे भीषण तांडव झाले. रुग्णालयाच्या आयसीयू कक्षात साधारणतः 25 रुग्ण उपचार घेत असतानाच ही दुर्घटना घडली. यात 16 रुग्णांचा बळी गेला.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे आदींनी या घटनेकडे गांभीर्याने पाहून चौकशी लावली. त्यातील दोषींवर कारवाई झाली, तर काहींची चौकशी अजूनही सुरूच आहे. जिल्हा रुग्णालयातील दोन आयसीयूपैंकी ज्यात जळीतकांड झाले, तो पोलिसांनी सील केला होता. नऊ महिन्यांनंतरही संबंधित आयसीयू दुरुस्तीचे काम सुरूच आहे.

दरम्यान संबंधित आयसीयूचे काम प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अद्यापही पूर्ण झालेले नाही. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे हे जातीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अभियंत्यांकडे पाठपुरावा करत आहे. त्यामुळे लवकरच हे काम पूर्ण होईल, असे आरोग्य प्रशासनाकडून सांगितले जात आहे,

सिव्हिल-पीडब्ल्यूडीची टोलवाटोलवी!

दुरुस्ती कामासाठी 2.5 कोटींचे अंदाजपत्रक होते. या कामाचा पहिला टप्पा मार्चअखेर पूर्ण करण्याच्या सूचना होत्या. मात्र, कोरोना रुग्ण असल्याने हस्तांतरणास उशीर झाल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे, तसेच या कामाचे टेंडर करताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उशीर झाल्याचेही त्यांच्याकडून आवर्जून सांगितले जाते. त्यामुळेच हे काम उशिराने सुरू झाले, तसेच पुढेही अतिशय संथगतीने सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

‘आयसीयू’ची क्षमता वाढणार!

आयसीयूचे नूतनीकरण करण्याबरोबरच इलेक्ट्रिफिकेशन, प्लंम्बिंग, फायर फायटरसह इतर आवश्यक काम पूर्ण झाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीयूची क्षमता वाढविली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सुसज्ज व्यवस्था असलेला एक मायक्रो प्लॅन तयार केला असल्याचे समजते.

एप्रिलमध्ये आयसीयूचे काम हाती घेतले. त्यासाठी अडीच कोटी खर्च अपेक्षित आहे. त्यात आयसीयूची क्षमता वाढविली जात आहे. पाच वार्डचे आयसीयूमध्ये नूतनीकरण केले जात आहे. हे काम शेवटच्या टप्प्यात असून , 15 दिवसांत ते पूर्ण होईल.

                                             – किशोर डोंगरे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Back to top button