‘त्या’ कुटुंबांचे पुन्हा सर्वेक्षण; वंचितांना मिळणार घरकुल: आ.पवार यांच्या प्रयत्नांना यश | पुढारी

‘त्या’ कुटुंबांचे पुन्हा सर्वेक्षण; वंचितांना मिळणार घरकुल: आ.पवार यांच्या प्रयत्नांना यश

जामखेड/कर्जत; पुढारी वृत्तसेवा: सर्वेक्षणाअभावी किंवा तांत्रिक चुकीमुळे घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार आहे. याबाबत कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय ग्रामविकासमंत्री गिरीराजसिंह यांची, तसेच राज्यातील अधिकार्‍यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता.
सप्टेंबर 2018 आणि मार्च 2019 मध्ये सामाजिक, आर्थिक आणि जात सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये पात्र लाभार्थ्यांची प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक चुकीमुळे तसेच काही लाभार्थ्यांचे सर्वेक्षणच करण्यात न आल्याने, अनेक पात्र कुटुंबांना घरकुलाच्या योजनेपासून वंचित रहावे लागले.

ही बाब लक्षात आल्यानंतर आमदार पवार यांनी थेट दिल्ली गाठून केंद्रीय ग्रामविकासमंत्री गिरीराजसिंह यांची भेट घेऊन हा प्रश्न त्यांच्याकडे मांडला होता. यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यावेळी त्यांनी दिले होते. तसेच या योजनेची अंमलबजावणी करणार्‍या राज्यातील यंत्रणेकडेही आ. पवार यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

त्यानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना पत्र देऊन घरकुलाच्या योजनेपासून वंचित राहिलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गावस्तरावर ग्रामसेवकामार्फत इतर संवर्गातील पात्र कुटुंबांची यादी आणि आवास प्लस प्रपत्र ‘ड’ अंतर्गत पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी आपापल्या गावच्या ग्रामसेवकाकडे संपर्क साधावा, असे आवाहन आमदार पवार यांनी केले आहे.

 

Back to top button