नगर : पोलिस अधिकार्‍यासह कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल | पुढारी

नगर : पोलिस अधिकार्‍यासह कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल

सोनई, पुढारी वृत्तसेवा : दोन युवकांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागुल यांच्यासह तीन कर्मचार्‍यांना निलंबित केले. त्यानंतर लगेचच मंगळवारी (दि.26) रात्री उशिरा पीडित राजेंद्र मोहिते यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलिस ठाण्यात बागुल यांच्यासह ‘त्या’ तीन कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेशवाडी येथील राजेंद्र रायभान मोहिते (वय 24, व्यवसाय मजुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.14 एप्रिल रोजी सोनई पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी त्यांच्या घरात शोध घेऊन, पोलिस ठाण्यात हजर होण्यास घरच्यांना सांगितले. दुसर्‍या दिवशी सोनई-राहुरी रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ सहाय्यक पोलिस निरीक्षक बागुल यांनी त्यांना रस्त्यावर खाली पाडून मारहाण करून पोलिस ठाण्यात आणले.

पोलीस ठाण्यात बागुल व उपनिरीक्षक उमेश पतंगे यांनी गिरणीच्या पट्ट्यानेे जबर मारहाण केली. यामध्ये आपल्या कानातून रक्तही आले. त्यानंतर त्यांनी आपल्याला बेडी घालून बसविले. थोड्या वेळाने एका अल्पवयीन मुलालाही पोलिस ठाण्यात मारहाण करून मला लावलेल्या बेडीतच त्या मुलाला लावले. कर्मचारी बाबा वाघमोडे यानेही मारहाण करून शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल, उपनिरीक्षक उमेश पतंगे, सहायक उपनिरीक्षक संजय चव्हाण व कर्मचारी बाबा वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी करत आहेत.

Back to top button