नगर : उद्यापासून आनंदऋषिजी महाराज जन्मोत्सव सोहळा | पुढारी

नगर : उद्यापासून आनंदऋषिजी महाराज जन्मोत्सव सोहळा

पाथर्डी तालुका, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंदऋषिजी महाराज यांचा 122 वा जन्मोत्सव सोहळा दि.28 व 29 जुलै रोजी चिचोंडी शिराळ येथे होत आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतीश गुगळे यांनी दिली.

आनंदऋषिजी महाराज यांचे गुरु शिक्षणमहर्षी रत्नऋषी महाराज यांचे जन्मगाव असलेल्या माणिकदौंडी येथे दि.28 जुलै रोजी सकाळी आनंद रथयात्रेचा शुभारंभ परिसरातील भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे. रथयात्रेचे दुपारी पाथर्डी शहरात आगमन होणार असून, दुपारी शनि मंदिरापासून सर्वधर्मिय धर्मगुरुंच्या व मान्यवरांच्या हस्ते रथाचे पूजन होऊन रथयात्रेस प्रारंभ होणार आहे. रथयात्रेमध्ये कलशधारी मुली, बँड पथक, ढोल पथक, लेझीम पथक, टाक पथक, टिपरी पथक सहभागी होणार आहेत.

जन्मोत्सव सोहळा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष चंपालाल गांधी, खजिनदार सुरेश कुचेरिया, विश्वस्त धरमचंद गुगळे, राजेंद्र मुथ्था, डॉ. ललित गुगळे आदीसह कार्यकारी मंडळ व स्थानिक सल्लागार मंडळ सदस्य तसेच संस्थेतील सर्व विभागाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रयत्न करीत आहेत.

मुख्य सोहळा शुक्रवारी

मुख्य सोहळा शुक्रवारी (दि. 29) आनंदऋषिजी यांचे जन्मगाव असलेल्या चिवडी (शिराळ) येथे होणार असून, सकाळी 8 वाजता चिचोंडी शिराळ येथे भव्य दिंडी नगर प्रदक्षिणा होणार आहे. त्यांनतर सुनंदाजी महाराज यांचे व्याख्यान होईल. तसेच, आनंद जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त ज्या आनंदभक्तांनी अठाई (आठ दिवसांचे निरंकार उपवास) केलेले आहेत, त्यांच्या पचकावणीचा कार्यक्रम होईल. संत एकनाथ महाराजांचे 13 वे वंशज प्रवीण महाराज गोसावी यांचे हरिकीर्तन होणार आहे. कार्यक्रमानंतर संपतलाल भटेवरा, आनंदकुमार चोरडिया, चंद्रकांत ओस्तवाल यांच्यातर्फे महाप्रसाद दिला जाणार आहे. श्री आनंद जैन मेडिकल ट्रस्टतर्फे रक्तदान शिबीर व मोफत नेत्र तपासणी, अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर होणार आहे.

Back to top button