नगर : ‘त्या’ छाप्याची साकूरमध्ये मोठी चर्चा | पुढारी

नगर : ‘त्या’ छाप्याची साकूरमध्ये मोठी चर्चा

संगमनेर विशेष, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील साकूर येथील तीन व्यापार्‍यांच्या दुकानावर अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी छापा टाकला. मात्र, या छाप्यात बेकायदेशीर काहीही आढळले नसल्याचे स्पष्टीकरण संबंधित अधिकार्‍यांनी दिले असले, तरी साकूरमध्ये मात्र या छाप्याविषयी उलट-सुलट चर्चेला उधान आले आहे.

मागील गुरुवारी अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासनातील चार अधिकार्‍यांनी खासगी वाहनाने येत संगमनेर तालुक्यातील मोठे गाव असलेल्या साकूर येथील तीन व्यापार्‍यांच्या दुकानावर व घरावर छापा टाकला. या छाप्यात त्यांनी अवैधरित्या ठेवलेला व बंदी असलेला गुटखा पकडल्याची चर्चा आहे. मात्र, संबंधित व्यापारी आणि या अधिकार्‍यांमध्ये आपापसात अर्थपूर्ण तडजोड झाल्याची चर्चा पठार भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळेच या अधिकार्‍यांनी कारवाई न करताच येथून निघून जाणे पसंत केल्याची चर्चा आहे.

संगमनेर तालुक्यात पठार भागातील साकुर हे मोठे गाव असून येथे मोठी बाजारपेठ आहे. यातील अनेक दुकानांमध्ये शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची मोठ्या प्रमाणात खुलेआम विक्री केले जाते. याबाबत काही लोकांनी अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रारी केल्याची चर्चा आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासनातील चार कर्मचारी गुरुवारी दुपारी साकूरमध्ये आले होते. त्यांनी तेथील काही व्यापार्‍यांच्या दुकानांची व घरांची ही झडती घेतली. या झडतीत या कर्मचार्‍यांना गुटखा सापडल्याची चर्चा आहे.

आम्ही ‘सर्च ऑपरेशनसाठी’ आलो होतो

या छाप्याबद्दल माध्यम प्रतिनिधींनी अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासनातील अधिकार्‍यांशी संपर्क साधला व साकूरमध्ये घडलेल्या छाप्याबाबत माहिती विचारली असता त्यांनी आम्ही तीन ठिकाणी सर्च ऑपरेशन केले. मात्र, या कारवाईत काहीही मिळाले नाही. त्यामुळे कारवाईचा प्रश्नच येत नसल्याचे सांगितले.

Back to top button