नगर : स्थानांतरणानंतरही कर्मचारी ‘तेथेच’! | पुढारी

नगर : स्थानांतरणानंतरही कर्मचारी ‘तेथेच’!

नगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेतील 59 कर्मचार्‍यांचे स्थानांतरण होऊन आठवडा उलटला. मात्र, अद्यापही संबंधित कर्मचार्‍यांना नियुक्तीच्या विभागात हजर होण्यासाठी विभागप्रमुखांनी सोडलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, ‘सामान्य प्रशासन’चे कर्मचारी मात्र नव्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाल्याचे समजते.

सीईओ आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी पारदर्शीपणे स्थानांतरण प्रक्रिया राबविली. यामध्ये एकाच विभागात पाच आणि एकाच टेबलवर तीन वर्षे काम केलेल्या 59 कर्मचार्‍यांची इतर विभागात रवानगी करण्यात आली. यामध्ये कक्ष अधिकारी, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक आदींचा समावेश आहे.
स्थानांतरण होऊन सात दिवस होत आले. मात्र, तरीही अनेकांनी आपले टेबल अजूनही सोडलेले नाहीत. याशिवाय विभागप्रमुखांनीही आपल्या कर्मचार्‍यांना सोडण्याचे धाडस दाखवलेले नाही. याउलट सामान्य प्रशासन विभागाचे स्थानांतरण झालेले कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाले आहेत.

दरम्यान, आरोग्य, लघू पाटबंधारे, बांधकाम इत्यादी विभागातील स्थानांतरण झालेले कर्मचारी अद्याप जुन्याच ठिकाणी काम पाहताना दिसत आहे. याप्रकरणी सीईओ येरेकर हे गांभीर्याने लक्ष घालणार असल्याची चर्चा आहे.

जिल्हा परिषदेत काही दिवसांपूर्वी स्थानांतरण झालेल्या सामान्य प्रशासनाच्या कर्मचार्‍यांना कालच नवीन नियुक्तीच्या ठिकाणी सोडले आहे. काही विभागाचे कर्मचारी अद्याप नियुक्तीच्या जागेवर गेलेले नाहीत. मात्र, लवकरच त्यांनाही सोडले जावे, याबाबत त्या-त्या विभागाला तशा सूचना केलेल्या आहेत.

                                                  – संदीप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.

Back to top button