नगर : घोडनदी पात्रातील लाखो मासे मृत | पुढारी

नगर : घोडनदी पात्रातील लाखो मासे मृत

काष्टी, पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील पश्चिमेकडे वाहाणार्‍या घोडनदी पात्रात मळी मिश्रित पाणी सोडल्याने नदीपात्रातील पाण्याचा रंग काळा झाला असून, हे पाणी दुषित झाले. यानंतर पाण्यातील लाखो मास्यांचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात दुरगंधी पसरल्याने नदीकाठच्या शेतकर्‍याचे मोठे नुकसान होत आहे.

सहकार महर्षी शिवाजी नागवडे सहकारी साखर कारखान्याने मळी मिश्रित पाणी सोडल्याने ही घटना घडली. सहा महिन्यांपासून घोडनदीपात्रात वाहते पाणी नाही. पावसाळा सुरू होवून दोन महिने झाले, तरी अजुन काष्टी परिसरात पाऊस नाही. आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नाने घोडच्या पाण्याचे योग्य नियोजन झाल्यामुळे सुमारे दिड महिने घोडचे आवर्तन चालू राहिल्याने या भागातील शेतकर्‍यांच्या शेतीला मोठा आधार मिळाला. त्यामुळे येथील विहिरीला पाणी वाढले. तसेच, याच पाण्यामुळे नदीपात्राती पाण्याचे खड्डे भरून घेता आले.

आता, पाऊस नसल्यामुळे नदीच्या खड्ड्यातील पाण्याचा येथील शेतकर्‍यांना मोठा आधार होता; परंतु गेली दोन दिवसांपासून सहकार महर्षी शिवाजी नागवडे सहकारी साखर कारखान्याने आपल्या काराखाना स्थळावरून मोठ्या प्रमाणात ऊसाची मळी ओड्यातून घोडनदीपात्रात सोडल्यामुळे येथील भरलेल्या खड्डातील संपूर्ण पाण्याचा रंग बदलून काळा झाला आहे. नदीपात्रातील खड्ड्यांमध्ये असणारे लाखो मासे मृत पावले. हे सर्व मासे पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. हेच मासे खाण्यासाठी विविध ठिकाणचे वेगवेगळ्या प्रकारचे पशुपक्ष्यांची परिसरात गर्दी होत आहे.

मृत मासे खाल्यानंतर अनेक पक्षांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले. तसेच, हेच नदीतील पाणी नदीकाठचे लोक घरात, तसेच जनावरांना पिण्यासाठी व शेतीला वापरत होते. परंतु, संपूर्ण पाणी दुषित झाल्याने ते वापरण्या योग्य राहिले नाही. पाण्यात मळी सोडल्याने सर्वत्र दुरगंधी सुटली आहे. नागवडे कारखान्याने हिच मळी नदीला पाणी आल्यानंतर पाण्याच्या मोठ्या प्रवाहत सोडली असती, तर शेतकर्‍याचे नुकसान झाले नसते. नदीपात्रातील मासे मृत झाले नसते.

मळी सोडणे त्वरित बंद करा

घोडनदीत सोडलेली मळी त्वरित बंद करून ही मळी अन्य ठिकाणी सोडावी. नदीकाठच्या शेतकर्‍याचे नुकसान करू नये, अन्यथा या भागातील सर्व शेतकरी कारखाना प्रशासनाच्या विरोधात जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती भैरवना सेवा संस्थेचे उपाध्यक्ष शेखर मोरे, चंद्रशेखर पाचपुते, श्रीकृष्ण मखरे, मच्छिंद्र पाचपुते, भाऊसाहेब मोरे, शेतकर्‍यानी दिली आहे.

Back to top button