नगर : गोदा तिरावरील गावांना सतर्कतेचा इशारा | पुढारी

नगर : गोदा तिरावरील गावांना सतर्कतेचा इशारा

शेवगाव तालुका, पुढारी वृत्तसेवा : जायकवाडी धरण भरण्याच्या मार्गावर असून, पाणी पातळी वाढत चालल्याने धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता लक्षात घेता शेवगाव तालुक्यातील गोदावरी तिरावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जायकवाडी धरण जवळपास 75 टक्के भरले असून, सोमवारी (दि. 18) सांयकाळी सहा वाजता पाणी पातळी 1517 फूट झाली आहे, तर जिंवत पाणीसाठा 1619.494 दलघमी झाला आहे. धरणात 32 हजार 620 क्युसेकने पाण्याची आवक चालू आहे. 74.60 टक्के धरण भरले असून, सोमवारी सकाळपासून पाणलोट क्षेत्रासह अनेक ठिकाणी पाऊस सुरू असल्याने ही आवक वाढत जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दोन-तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविल्याने पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणाच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेता धरण भरू शकते. त्यामुळे धरणाचे गेट उघडले जाऊन गोदावरी पात्रात विसर्ग सोडण्याबाबत प्रशासन पातळीवर विचारविनियम सुरू आहे.

जायकवाडी पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असून, त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील नदी नाल्याद्वारे जायकवाडी धरणातील पाण्याची आवक पाहता पाणी पातळी वाढत आहे. धरणाचे परिचलन सुचिनुसार आवश्यक पाणी पातळी नियमन करावयाचे असल्याने अशीच आवक सुरू राहिल्यास नजिकच्या काळात धरणातूून अथवा सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात पाणी सोडावे लागणार असल्याने धरणकाठ व गोदाकाठच्या दोन्ही तिरावरील नागरिकांना शेवगाव प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

भरण्यास पाच फूट बाकी

जायकवाडी धरण भरण्यास फक्त पाच फूट बाकी आहे. पावसाचा जोर वाढल्यास धरण दोन दिवसांतही भरू शकते. त्यामुळे कोणत्याही क्षणी दरवाजे उघडण्याची शक्यता आहे; मात्र जोर ओसरल्यास जायकवाडी धरण भरण्यास आठ पंधरा दिवसाचा कालावधीही लागू शकतो.

नवा विक्रम स्थापित होणार

भातकुडगाव : नगर जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठावरील शेवगाव, नेवासा, पाथर्डी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाबाबतचा पाणी प्रश्न जायकवाडी धरण 75 टक्के भरल्याने सुटला असून, लाभार्थी परिसरात आनंद व्यक्त होत आहे. धरणात सध्या 32 हजार 620 क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. आता, धरण पाणीसाठ्याची शतकाकडे वाटचाल सुरू आहे. दोन दिवस विश्रांतीनंतर पावसाने सोमवारी पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग गोदावरी नदीत होऊन जायकवाडीचा पाणीसाठा जुलैमध्ये शंभर टक्के भरण्याची सलग चौथ्या वर्षी शक्यता निर्माण झाली आहे. जुलै महिन्यात जलाशय भरल्यास धरण निर्मिती इतिहासात जुलै महिन्यात भरण्याचा नवा विक्रम स्थापित होणार आहे.

Back to top button