शिक्षक ठोठावणार उच्च न्यायालयाचे दार | पुढारी

शिक्षक ठोठावणार उच्च न्यायालयाचे दार

नगर : पुढारी वृत्तसेवा :  प्राथमिक शिक्षक बँकेसाठी 24 जुले रोजी मतदान होते. मात्र शासनाने राज्यातील काही ठिकाणची अतिवृष्टी आणि निर्माण झालेली पूरस्थिती पाहता 30 सप्टेंबरपर्यंत सर्व निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शिक्षक बँकेची निवडणुकही लांबल्याने सर्वच शिक्षक संघटनामधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

यातून सत्ताधारी गुरुमाऊलीसह, गुरुकुल, रोहकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली आणि सदिच्छा ही चारही मंडळे न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत. तांबे गट सर्वप्रथम सोमवारी याचिका दाखल करणार आहे. शिक्षक बँकेच्या 21 जागांसाठी 24 जुलै रोजी मतदान व 25 रोजी मतमोजणी होणार आहे. सर्व संघटनांचा प्रचारही जोरात सुरू आहे.

मात्र शासनाने अचानक 30 सप्टेंबरपर्यंत निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षक संघटना आणि उमेदवार आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहेत. सर्वात प्रथम सत्ताधारी गटाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी तसा निर्णय जाहीर करत शनिवारी बँकेचे माजी अध्यक्ष साहेबराव अनाप, माजी उपाध्यक्ष अर्जुनराव शिरसाठ, उमेदवार रामेश्वर चोपडे, महेंद्र भणभणे व बाळासाहेब सरोदे यांच्यासमवेत उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपिठात अ‍ॅड. शिवाजी शेळके यांच्याकडे शिक्षक बँक निवडणुकीसंदर्भात निवडणूक वेळेत घेणेबाबत याचिका दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

सोमवारी ही याचिका दाखल केली जाणार आहे. तसेच शिक्षक बँक व विकास मंडळ निवडणूक एकाच वेळी घेण्यात यावी, यासाठी विकास मंडळाच्या निवडणूक अधिकारी यांच्याकडे लेखी मागणी केली आहे. गुरुकुलचे नेते डॉ. संजय कळमकर यांनी निवडणूक वेळेत घेण्यासाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा सुरू केला आहे.

शिवाय, न्यायालयातही स्वतंत्र याचिका दाखल करण्याचा त्यांच्या गोटात हालचाली सुरू आहेत. तिकडे रोहकले गुरुजी प्रणित गुरुमाऊलीचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे यांनीही मुख्यमंत्री, तसेच सहकार आयुक्तांना पत्र पाठवल्याचे कळवले आहे. सोमवारी त्यांच्याकडूनही न्यायालयीन प्रक्रियाही पूर्ण केली जाणार आहे. सदिच्छाचे राजेंद्र शिंदे, आबासाहेब जगताप, एकनाथ व्यवहारे हे देखील वेळेत निवडणुका व्हाव्यात, यासाठी आग्रही आहेत.

Back to top button