जामखेड : पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे माहेरचे वंशज असलेले आमदार प्रा राम शिंदे यांनी जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र चोंडी या आपल्या गावी अहमदनगर (अहिल्यानगर) दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. आमदार प्रा राम शिंदे यांनी जामखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र चोंडी येथील बुथ क्रमांक 229 वर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांच्या आई भामाबाई शिंदे, पत्नी आशाताई शिंदे यांनीही यावेळी मतदानाचा हक्क बजावला.
अहमदनगर (अहिल्यानगर) दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप विरूध्द राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यात कडवी झुंज आहे. भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी प्रचंड मेहनत घेतली. शिंदे हे कर्जत जामखेड मतदारसंघात गेल्या महिनाभरापासून तळ ठोकून होते. मतदारसंघातील गावा- गावात जाऊन आमदार शिंदे यांनी तगडी प्रचार मोहिम राबवली. शिंदे यांच्या अचूक नियोजनामुळे विरोधकांचे धाबे दणाणल्याचे चित्र प्रचारकाळात दिसून येत होते.
आज 13 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अहमदनगर (अहिल्यानगर) दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे. आमदार प्रा राम शिंदे यांनी चोंडी या आपल्या जन्मगावी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर आमदार शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू झाले आहे.37 अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामधील श्री क्षेत्र चोंडी ता जामखेड येथील 229 बुथवर माझा मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्वांनी मतदान करून आपल्या देशाची लोकशाही समृद्ध व सुदृढ करावी असे अवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
हेही वाचा