नगर : प्राथमिक शिक्षक बँक निवडणूक लांबणीवर! | पुढारी

नगर : प्राथमिक शिक्षक बँक निवडणूक लांबणीवर!

नगर : पुढारी वृत्तसेवा : शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वच शिक्षक संघटना आणि प्रशासनाची तयारी सुरू असतानाच, राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या अहवालानुसार आता 30 सप्टेंबरपर्यंत बँकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षक संघटना आणि उमेदवारांचाही हिरमोड झाला आहे.

शासनाने मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन व वाहतूक व्यवस्था विचारात घेवून जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीमध्ये सहभाग नोंदविता यावा, यासाठी सहकारी संस्था अधिनियम 1960 अन्वये राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर दि. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

या आदेशान्वये आता जिल्ह्यात रंगतदार स्थितीत पोहचलेल्या शिक्षक बँकेच्या निवडणुकीलाही अडथळा निर्माण झाला आहे. बँकेच्या 21 जागांसाठी सत्ताधारी गुरुमाऊलीचे नेते बापूसाहेब तांबे, रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली, डॉ. संजय कळमकर यांचे गुरुकुल आणि राजेंद्र शिंदे आणि एकनाथ व्यवहारे यांचे सदिच्छा व इब्टाची आघाडी अशी चौरंगी सामना रंगला आहे.

24 जुलैला मतदान आणि 25 ला मतमोजणीचे नियोजन होते. त्यामुळे सर्वच शिक्षक संघटनांनी प्रचाराला वेग दिला होता. आता निवडणूक निर्णायक टप्प्यावर असतानाच आपत्ती व्यवस्थापनच्या अहवालानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. त्यात शिक्षक बँकेचाही समावेश असल्याची माहिती सहायक निबंधक देवीदास घोडेचोर यांनी दिली.

दरम्यान, निवडणूक लांबल्याने शिक्षक नेत्यांचा हिरमोड झाल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे काही संघटना मात्र या निर्णयाकडे एक संधी म्हणून पाहत आहे. निवडणुका पुढे ढकलल्याने आता प्रचारासाठी आणखी वेळ मिळणार असल्याने यातून सर्व संघटनांना आणखी तयारी करता येणार असल्याचीही सकारात्मक चर्चा आहे.

Back to top button