नगर : चाकूहल्ला करीत साडेपाच लाखांचा ऐवज लांबविला | पुढारी

नगर : चाकूहल्ला करीत साडेपाच लाखांचा ऐवज लांबविला

पिंपरी जलसेन, पुढारी वृत्तसेवा : चाकूने मानेवर व तोंडावर हल्ला करून महिलेच्या अंगावरील साडेदहा तोळे सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांनी पलायन केले. चोरट्यांच्या हल्ल्यात वसंत विष्णू पुरंदरे जखमी झाले आहेत. बुधवारी (दि.13) पहाटेच्या सुमारास पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे ही घटना घडली.

पिंपरी जलसेन येथील रोकडोबा मंदिरासमोरील किराणा दुकानदार वसंत विष्णू पुरंदरे यांच्या दुसर्‍या मजल्यावरील घराच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी बुधवारी पहाटे दीड ते दोनच्या सुमारास घरात प्रवेश केला. त्यावेळी घरात वसंत पुरंदरे व पत्नी मीनाक्षी झोपलेले होते. घरात घुसलेल्या 2 चोरट्यांनी मीनाक्षी यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने ओरबाडण्याचा प्रयत्न केला असता, पती वसंत पुरंदरे यांनी चोरट्यांना विरोध केला. त्यावेळी चोरट्यांनी चाकूने वसंत पुरंदरे यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात त्यांच्या मानेवर, चेहर्‍यावर, डोळ्याला दुखापत झाली. चोरट्यांनी मीनाक्षी यांच्या अंगावरील दागिने व हातातील बांगड्या असे साडे दहा तोळ्यांचे सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचा ऐवज घेऊन पोबारा केला.

घटनेची माहिती समजताच पारनेरचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथकला पाचारण करून पुढील तपास करत आहेत. यापूर्वी देखील गावातील पतसंस्था फोडण्याचा देखील प्रयत्न झाला होता. चोरीचा तपास लावण्याचे मोठे आव्हान आहे.

Back to top button