राहुरी : त्या कुत्र्याकडून चार जणांसह जनावरांना चावा | पुढारी

राहुरी : त्या कुत्र्याकडून चार जणांसह जनावरांना चावा

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर गावामध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला असतानाच एका पिसाळलेल्या कुत्र्याने गावामध्ये धुमाकूळ घातला. चक्क चार जणांना चावा घेत जखमी केलेल्या त्या पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील शेळ्या, गाया व गाढवांनाही चावा घेतला. दरम्यान, चावा घेतलेल्या चार जणांना लस घेण्यासाठी नगर येथील जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.

गुरूवारी सकाळी नियमितप्रमाणे ग्रामस्थ आपल्या कामकाजात मग्न होते. त्याचवेळी गावामध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने शिरकाव केला. शेतात काम करणारे शेतकरी, व्यावसायिकांसह शेळ्या, गाया व गाढवांना चावा घेत पिसाळलेल्या कुत्र्यांनी कहरच केला. गावातील वसीम देशमुख, रोहित आघाव, ताराचंद गायकवाड यांसह एका लहान मुलाला चावा घेतलेल्या त्या कुत्र्याने साहेबराव माळी यांच्या दोन गायी, गावातील शेळ्या व गाढवांनाही चावा घेतला. चावा घेतल्यानंतर बारागाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेतले.

संबंधितांना तातडीने नगर येथील जिल्हा रूग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात असून ग्रामस्थांना लस देण्यात आली आहे.
गावामध्ये वाढत्या भटक्या कुत्र्यांची संख्या ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गावातील कब्रस्थान परिसरामध्ये काही जण कोंबड्याचे पख, मांस आणून टाकत आहेत. त्यामुळे गावात घाणीचे साम्राज्य वाढत आहे. तर वाढत्या घाणीच्या साम्राज्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे.

नागरिकांनी काळजी घ्यावी : डॉ. बोराडे
कुत्रा चावल्याने चार जणांवर बारागाव नांदूर प्राथमिक केंद्रात प्राथमिक उपचार दिल्यानंतर लस देण्यासाठी नगर सिव्हिल येथे पाठविण्यात आले होते. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे अवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. वृषाली बोराडे यांनी केले आहे.

Back to top button