ठेकेदाराने कोरे धनादेश केले परत! ‘क्रीडांगण’ अहवालाकडे लक्ष | पुढारी

ठेकेदाराने कोरे धनादेश केले परत! ‘क्रीडांगण’ अहवालाकडे लक्ष

नगर: पुढारी वृत्तसेवा: बहुचर्चित क्रीडांगण विकास योजना प्रकरणाची जिल्हा परिषद व क्रीडा विभागाकडून चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीत शाळांची कामे परस्पर कोणी व कोणाला दिली, कोरे धनादेश घेणारे ठेकेदार कोण, त्यांना आशीर्वाद कोणाचे, याचा उलगडा दोन दिवसांत होणार आहे. दरम्यान, चौकशी सुरू होताच सोमवारी संबंधित ठेकेदाराने काही शाळांचे कोरे धनादेश परत केल्याने शंका उपस्थित होत आहे. ‘पुढारी’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेत चौकशी सुरू केली आहे.

क्रीडांगण विकास योजनेतून 64 शाळांची कामे केली जात आहे. मात्र, शाळांना विचारात न घेता परस्पर कामे दिली आहेत. तर ज्यांनी प्रस्ताव मंजूर केले, ज्यांच्याकडे निधी देण्याची तरतूद आहे, अशा क्रीडा विभागालाही कोणी काम केले, हे माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. ठेकेदाराकडूनही शाळेच्या नावाचे कोरे लेटरहेड, कोरे धनादेश घेतले गेल्याचीही चर्चा होती. या सर्व पार्श्वभूमीवर पुणे विभागीय क्रीडा उपसंचालक प्रमोदिनी गड्डमवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर यांनी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घातले.

सीईओ येरेकर यांच्या सुचनेनुसार शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सर्व गटशिक्षणाधिकार्‍यांना संदेश देवून दोन दिवसांत मुख्याध्यापकांना लेखी खुलासा पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत, तर क्रीडा उपसंचालिका गड्डमवार यांनीही जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांना चौकशी करण्याच्या सूचना केल्याचे समजते. त्यामुळे या योजनेची चौकशी सुरू होताच, सोमवारी संबंधित ठेकेदाराने काही शाळांच्या मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षांशी संपर्क करून कोरे धनादेश परत करत असल्याचे कळविले. दुपारी उशीरापर्यंत हे धनादेश संबंधित शाळांना परत करण्याचे काम सुरू होते,असेही विश्वसनिय सूत्रांकडून समजले.

क्रीडा विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी, पण..!
वरिष्ठांच्या आदेशाने जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले व क्रीडा अधिकारी दीपाली बोडखे यांनी प्रत्यक्षात कामे झालेल्या शाळांच्या मैदानाची पाहणी सुरू केली आहे. याबाबत त्यांना विचारणा केली असता, आम्ही पाहणी सुरू केली आहे, मात्र, पाहणी करताना ती कामे कुणी केली, हे शाळांकडून सांगितले जात नसल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button