नगर : मध्यस्थांनी चक्क तृतीयपंथीयाशी लावले लग्न ! | पुढारी

नगर : मध्यस्थांनी चक्क तृतीयपंथीयाशी लावले लग्न !

दीपक वाघमारे

देवदैठण : मध्यस्थ मंडळींनी फसवणूक करीत श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील लग्नाळू तरुणाचा विवाह चक्क तृतीयपंथीयाशी लावला. लग्नानंतर मध्यस्त पैसे घेऊन पसारही झाले. या तरूणाचे लग्नाचे स्वप्न मात्र भंगल्याचे पाहावयास मिळाले. समजलेल्या माहितीनुसार औरंगाबाद येथील एका एजंट महिलेने लग्न जमवून देते म्हणत लाखो रुपयो घेऊन संबंधित मुलाचे सूत जालना येथील एका सुंदर मुलीशी जुळवून दिले. पुढे काही ठराविक पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न झाले.

लग्नानंतर आवश्यक त्या सर्व धार्मिक प्रथाही पाळण्यात आल्या. लवकरच त्या दोन जीवांचे मिलन होणार होते. नवरदेव बिचारा पुढील आयुष्याच्या सुवर्णमयी स्वप्नांत हरवलेला होता. लग्नाच्या तिसर्‍या दिवशी मात्र या प्रकाराचा भांडाफोड झाला. जिच्याशी लग्न झाले, ती मुलगी नसून चक्क तृतीयपंथी असल्याचे स्पष्ट झाले आणि नवरदेवाच्या पायाखालची वाळूच सरकली.

सावकार म्हटल्याने मित्रांत वाद; चाकूहल्ल्यातील जखमीचा मृत्यू

आपले खरे रुप नवरदेवासह कुंटुबातील सर्वांना कळाले आहे, हे लक्षात आल्यानंतर तृतीयपंथीयाने आक्रमक भूमिका घेतली. त्याने चक्क नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांनाच मारहाणीचा उद्योग केला. पापभिरू असलेल्या संबंधित कुटुंबाने पोलिस ठाणे गाठण्याचा निर्णय घेतला. प्रकरण बेलवंडी पोलिस ठाण्यात गेले. मात्र, एका मोठ्या नेत्याच्या मध्यस्थीने हे प्रकरण बाहेरच मिटविण्यात आले.

दरम्यान, आता आपली धडगत नाही, हे लक्षात आल्यानंतर तृतीयपंथीयाने तेथूळ पळ काढत आपली सुटका करून घेतली. नवरदेवासह त्याच्या परिवारावर मात्र पश्चातापाची वेळ आली आहे.

पूर्ण चौकशीअंतीच विवाह जुळवा
सध्या सुक्षितीत बेरोजगारांची संख्या कमालीची वाढल्याने वयाची 30 ते 35 वर्षे उलटूनही लग्न जमत नसलेल्या लग्नाळूंची अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे कुठलीही विचारपूस न करता जमेल त्या मुलीशी लग्न करण्याची घाई नवरदेवासह त्याच्या घरचेही करतात. त्यामुळे मध्यस्तांमार्फत असे फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. फसवणूक टाळण्यासाठी पूर्ण माहिती घेऊनच विवाह जुळवावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Back to top button