सावकार म्हटल्याने मित्रांत वाद; चाकूहल्ल्यातील जखमीचा मृत्यू | पुढारी

सावकार म्हटल्याने मित्रांत वाद; चाकूहल्ल्यातील जखमीचा मृत्यू

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा सावकार म्हटल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातील जखमी भरत शंकर नाईक (वय 29, रा. केर्ली, ता. करवीर) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चाकूहल्‍ला करणार्‍या संदीप बापू माने (रा. सोनतळी) याला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. एका महिलेलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

भरत नाईक हा गवंडी काम करीत होता. शुक्रवारी सोनतळी येथे पैसे मोजत असताना संशयित संदीप माने याने त्याला ‘सावकार’ म्हणून चिडवले होते. यातून दोघांचे भांडण झाले. रात्री दहाच्या सुमारास संदीप माने याने भांडण मिटविण्यासाठी भरतला घराजवळ बोलावले. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद होऊन झटापट झाली. यावेळी संदीपने स्वत:जवळील चाकूने भरतच्या पोटावर, मानेवर वार केले. मानेवर वार वर्मी लागल्याने भरत गंभीर जखमी झाला. सीपीआरमध्ये उपचारादरम्यान शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी करवीर पोलिसांनी संदीप मानेला अटक केली. न्यायालयाने त्याला 28 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सावकार म्हटल्याचे निमित्त
भरत नाईक हा गवंडी काम करत होता, तर संशयित संदीप माने हा सर्व्हिंसिंग सेंटरवर कामाला जात होता. दोघांची कामाच्या निमित्ताने ओळख झाली होती. शुक्रवारी भरत नाईक पैसे मोजत असताना संदीपने त्याला ‘सावकार’ अशी हाक मारली. याच कारणावरून वाद होऊन रात्री भांडण मिटविण्याच्या प्रयत्नात चाकूहल्‍ला होऊन यामध्ये भरतचा मृत्यू झाला.

मानेवर वर्मी घाव
भरत नाईक याच्या मानेवर झालेला वार अत्यंत वर्मी लागला. मोठ्या प्रमाणात रक्‍तस्त्राव होऊन त्याची प्रकृती गंभीर बनली होती. उपचार सुरू असताना सकाळी साडेसातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. गुन्ह्यातील धारदार चाकू पोलिसांनी जप्‍त केला आहे.

Back to top button