नगर : भाजपचा विखेंना घरचा ‘आहेर’ | पुढारी

नगर : भाजपचा विखेंना घरचा ‘आहेर’

नगर : भाजप खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी शिवसेनेला पाठबळ देण्याचे केलेले पारनेरमधील वक्तव्य, त्यांचे वडील माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला लोणीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देवेंद्र फडणवीसांच्या सरकारसाठी घातलेली साद..

हा चर्चेचा विषय ठरलेला असतानाच भाजप नेतृत्वाने शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी नाशिकचे आमदार राहुल आहेर यांच्यावर टाकत विखेंना घरचा ‘आहेर’ दिल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगली आहे. शिर्डी हा विखेंचा बालेकिल्ला असून मतदारसंघावर त्यांचा प्रभाव किती आहे, हे नगरकरांचा आजही ‘आठवते’. लोकसभेसाठी ‘मिशन 45’ या भाजपच्या घोषणेने शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांची राजकीय वाट बिकट होणार आहे. दुसरीकडे माजी मंत्री राम शिंदे यांच्यावर भाजप नेतृत्वाने पुन्हा एकदा विश्वास टाकत त्यांना पवारांशी भिडण्यासाठी बारामतीत धाडले आहे.

राज्याच्या राजकारणात भाजप-शिवसेनेत कमालीचे वितुष्ट असताना, पारनेरातील ‘ते’ वक्तव्य म्हणजे, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत खा. विखे आजोबांच्या पावलावर पाऊल देत पक्षविरहित विकास आघाडी करतात की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. आपल्या खासदारकीत शिवसेनेचा 50 टक्के वाटा असल्याचे सांगत शिवसैनिकांना वार्‍यावर सोडणार नसल्याचे विखेंनी ठासून सांगितले. शिवसेनेला ताकद देऊन पारनेरचे आमदार नीलेश लंके यांची राजकीय कोंडी करण्याची रणनीती त्यामागे आहेच. पण, त्याहीपेक्षा खा. विखेंची तालुकानिहाय बदलणारी भूमिका पाहता त्यांची ‘विकास आघाडी’ची चाचपणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विखे ज्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात, त्या मतदारसंघात राष्ट्रवादी ताकदवर आहे. पारनेरात सेनेला पाठबळ देतानाच खा. शरद पवार यांचे पाठबळ लाभलेले राष्ट्रवादीचे आ. लंके यांना कडाडून विरोध करायचा, तर नगर शहरात सेनेला एका विशिष्ट अंतरावर ठेवत, काँग्रेस नगरसेवकांसोबत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे. जुने राजकारण अडगळीत टाकत राहुरीत राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे-विखेंनी एकमेकांविरोधात टोकाची भूमिका घेतल्याचे ऐकिवात नाही.

श्रीगोंद्यातील सर्वपक्षीयांना आपलेसे वाटणारे विखे पाथर्डी-शेवगावात सेनेला पाठबळ देण्यात मात्र कच खातात. कर्जत-जामखेडात राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांना वरवरचा विरोधही करताना दिसतात. विखेंच्या तालुकानिहाय बदलत्या भूमिकेने जिल्ह्यात राजकीय गोंधळ सुरू आहे. तसंच, माजी आमदार शिवाजी कर्डिले हेदेखील विखेंच्या भूमिकेने राहुरीत बुचकळ्यात पडलेले दिसतात.

खासदार विखे विश्वासात घेत नाहीत, निधी देत नाहीत, अशी तक्रार पारनेर भाजपने माजी मंत्री आमदार आशिष शेलार यांच्याकडे थेटपणे मांडली. आगामी लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा चेहरा होऊ पाहणारे आ. लंके यांच्या विरोधासाठी खा. विखेंनी शिवसेनेला जवळ केल्याचे दिसत असले, तरी तालुकानिहाय बदलणारी खा. विखेंची भूमिका भाजप पदाधिकार्‍यांना गोंधळात टाकणारी ठरू पाहते आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगर जिल्ह्याची प्रभारी जबाबदारी असताना खा. विखेंची भूमिका आणि आ. विखे यांनी अजित पवारांना घातलेली साद अन् त्यावर शब्दानेही प्रतिक्रिया न देणारे भाजप नेते, हा राजकीय पट जसा गोंधळात टाकणारा आहे, तसाच तो विखेंच्या भूमिकेला पक्षाचे पाठबळ तर नाहीना, अशी शंकाही उपस्थित करू पाहणारा आहे.

यापुढची विखे पिता-पुत्रांची भूमिका काय? अन् पक्षाकडून त्यावर येणारी प्रतिक्रिया, यावरच नगरचे राजकारण ठरेल. जिल्हा परिषद निवडणुकीत ‘मविआ’चे तिन्ही पक्ष एकत्र आले, तर भाजप अर्थात विखेंची राजकीय कमांड सैल होईल. विखेंशी सलगी साधून असणार्‍या ‘मविआ’ नेत्यांना भाजपसोबत उघडपणे येणे शक्य नसल्याने ‘स्थानिक विकास आघाडी’च्या बॅनरखाली त्यांना सोबत घ्यायचे अन् जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा (खरे तर विखेंचाच) फडकावयाचा असाही ‘खेळ’ विखे खेळू शकतात!, तशीच चर्चा राजकीय वर्तुळात झडते आहे.

डॉ. आहेर करणार शिर्डीचे ऑपरेशन !
भाजपने ‘मिशन 45’ चा नारा देताना सेना खासदार असलेल्या दहा जागांना लक्ष्य केले आहे. आज राज्यात भाजपचे 23 तर सेनेचे 18 खासदार आहेत. 18 पैकी 10 मतदारसंघ हिसकावण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. भाजप नेत्यांवर त्याची जबाबदारीही देण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांचा शिर्डी लोकसभा मतदारसंघही भाजपने टार्गेट केला आहे. शिर्डी मतदारसंघावर प्रभाव असलेले माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भाजप प्रदेश नेतृत्वाने पुन्हा एकदा अविश्वास दाखविल्याचे यातून दिसते. शिर्डीत विखे पॉवरफुल्ल असतानाही त्यांच्याऐवजी राहुल आहेर यांना शिर्डीत राजकीय ऑपरेशन करण्यासाठी पाठविले आहे. आहेर हे नाशिक जिल्ह्यातील चांदवड-देवळा मतदारसंघाचे भाजप आमदार असून वैद्यकीय पदवीप्राप्त आहेत. ते विखेंच्या शिर्डीत कसे ‘ऑपरेशन’ करतात, हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राम शिंदे पुन्हा पवारांशी भिडणार!
माजी मंत्री राम शिंदे यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी देतानाच त्यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविली आहे. राम शिंदे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे खास मर्जीतील म्हणून ओळखले जातात. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा परंपरागत मतदारसंघ आहे. तोच भाजपने टार्गेट करत शिंदे यांच्यावर ती जबाबदारी दिली आहे. दोन टर्म आमदार व मंत्री असताना शिंदे यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील रोहित (खा. सुळेंचे भाचे) यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात पराभव केला. कर्जत-जामखेड मतदारसंघात राम शिंदे व पवार यांचे राजकीय हाडवैर. कर्जत-जामखेडचा वाचपा काढण्यासाठी तर भाजपने शिंदे यांना बारामतीला धाडले नसेल ना?

Back to top button