नगर : महिलेच्या गळ्यातील गंठण ओरबाडून नेले | पुढारी

नगर : महिलेच्या गळ्यातील गंठण ओरबाडून नेले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी फॅक्टरी येथे पायी जाणार्‍या महिलेच्या पाठीमागून धूमस्टाईलने येत दुचाकीस्वारांनी गळ्यातील दीड तोळ्याचे छोटे व मोठे गंठण ओरबाडून नेल्याची घटना घडली. यामध्ये महिलेच्या गळ्याला दुखापत झाली. दोघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विना राजेश मंचरे (वय 40, रा. राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) 14 जून रोजी सायंकाळच्या वेळी कामावरून घरी येत होत्या. त्या विवेकानंद नर्सिंग होम समोरून घरी पायी जात असल्याचे पाहून पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी संधी साधली. त्यांच्या गळ्यातील छोटा व मोठा असे दोन दीड तोळे वजनाचे गंठण चोरट्यांनी ओरबाडून घेतले आहे.

मंचरे यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरीकांनी धाव घेतली. परंतु, तोपर्यंत संबंधित चोरटे हे धूमस्टाईलने शिर्डीच्या दिशेने निघून गेले. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यामध्ये मंचरे यांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबाबत पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी चौकशी सुरू केली आहे. सीसीटिव्ही तपासणी करीत या आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे समजले.
दरम्यान, राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये चैन स्नेचिंगचे प्रकार पुन्हा सुरू झाल्याने संताप व्यक्त होत असल्याचे चित्र दिसत आहे.

Back to top button