घरकुलांना महागाईची झळ; ठेकेदाराने काम थांबविले | पुढारी

घरकुलांना महागाईची झळ; ठेकेदाराने काम थांबविले

सूर्यकांत वरकड

नगर : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नगर शहरातील केडगाव, नालेगाव, आगरकर मळा या ठिकाणी घरकुल प्रकल्प उभारणी सुरू आहे. लाभार्थ्यांचा बुकिंगसाठी थंड प्रतिसाद आणि वाढत्या महागाईने ठेकेदाराने घरकुल प्रकल्प उभारण्यास असमर्थता दशविली आहे. तर, आगरकर मळ्यातील प्रकल्पाची तीन वेळा निविदा प्रसिद्ध करून कोणीही टेंडर भरले नाही. त्यामुळे घरकुल प्रकल्पाचे भवितव्य अद्याप अंधातरीच आहे.

महापालिका हद्दीत नालेगाव 216, केडगाव 624 सदनिकांची पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल उभारले जात आहे. या दोन्ही प्रकल्पासाठी सुमारे 76 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे. त्यासाठी वर्षभरापूर्वी अर्ज मागविले होते. हजारोच्या घरात अर्ज आल्याने सोडत पद्धतीने लाभार्थी निश्चित केले होते. एका घराच्या बुकिंगसाठी एक लाख रुपये भरावे, अशी अट मनपाने घातली होती.

पुणे : ओतूर येथे नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात, एक ठार

मात्र, स्थायी समितीत त्यावर चर्चा होऊन ती अट 50 हजारांची करण्यात आली. बहुतेक लाभार्थी मजुरी करणारे असल्याने त्याना एक लाख रुपये भरणे शक्य नव्हते. त्यामुळे बुकिंगला प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, आगरकर मळ्यात 594 घरांच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. त्याची निविदाही दोन वेळा प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, अद्याप त्या निविदेला प्रतिसाद मिळालेला नाही. मनपाकडून आता तिसर्‍यांदा ती निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

केडगाव व नालेगाव येथील घरकुल प्रकल्पाचा कार्यरंभ आदेश होऊन दोन वर्ष झाली तरी अद्याप ठेकेदाराने काम सुरू केलेले नाही. याबाबत महापालिलेने संबंधित ठेकेदाराला नोटीस देऊन दोन वर्षात काम पूर्ण का केले नाही, असा जाब विचारला. त्यावर संबंधित ठेकेदाराने महागाई वाढल्याने पहिल्या खर्चाच्या तरतुदीनुसार काम होणे शक्य नाही, असे म्हणून काम करण्यास असमर्थता दर्शविली आहे.

जालना : परतूर तहसीलदारच्या शासकीय निवासस्थानावर अज्ञाताकडून दगडफेक

सिमेंट, स्टिल, खडी आदी साहित्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने काम करणे अशक्य झाले आहे, असे सांगितले. पहिल्या खर्चात काम करण्यास परवडत नाही असे लेखी द्या, असे मनपाने सुनावले आहे. संबंधित ठेकेदाराने वेळेत काम न केल्याने मनपा पुन्हा त्या प्रकल्पाची पुनर्निविदा प्रसिद्ध करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. दरम्यान, संजयनगरमध्ये 298 सदनिकाचा घरकुल प्रकल्प आहे. त्यातील 33 सदनिकाचे कामपूर्ण झाले असून, त्याचे लाभार्थ्यांना वाटप केले आहे.

लाभार्थ्यांचे पैसे परत देण्याची नामुष्की

घरकुल बुकिंगसाठी सुरूवातीला तब्बल 12 हजार अर्ज आले. एकूण घरकुलांच्या संख्येत लाभार्थी जास्त असल्याने छाननी करून सोडत पद्धतीने लाभार्थी निश्चित केले. तरी लाभार्थ्यांनी बुकिंगला प्रतिसाद दिला नाही. केडगाव घरकुलसाठी 37 पैकी 16 जणांनी पैसे परत घेतले. तर, नालेगाव प्रकल्पातील 19 पैकी 13 लाभार्थ्यांनी पैसे परत घेतले. ठेकेदार काम करीत नसल्याने महापालिकेला लाभार्थ्यांनी बुकिंगसाठी भरलेले पैसे परत देण्याची वेळ आली.

नागपूर : बँकेला पावणेदोन कोटींचा गंडा घालणार आरोपी निघाला राष्ट्रवादीचा पदाधिकारी

नालेगाव घरकुल प्रकल्प
मंजुरी : एप्रिल 2018
कार्यरंभ : 18 सप्टेंबर 2019
इमारती : 09
सदनिका : 216
एका सदनिकेचा खर्च : 9 लाख 90 हजार
एकूण प्रकल्प खर्च : 21 कोटी

केडगाव घरकुल प्रकल्प
मंजुरी : एप्रिल 2018
कार्यरंभ : 18 सप्टेंबर 2019
इमारती : 26
सदनिका : 624
एका सदनिकेचा खर्च : 8 लाख 94 हजार
एकूण प्रकल्प खर्च : 55 कोटी

आगरकरमळा घरकुल प्रकल्प
मंजुरी : 21 नोव्हेंबर 2019
कार्यरंभ : दोन वेळा निविदा प्रसिद्ध
इमारती : 22
सदनिका : 594
एका सदनिकेचा खर्च : 11 लाख
एकूण प्रकल्प खर्च : 65 कोटी

केडगाव व नालेगाव येथील घरकुल प्रकल्पाच्या ठेकेदारांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. त्यांनी काम करण्यास असमर्थता दशविली आहे. आणखी एकदा त्यांच्याशी चर्चा करून प्रकल्पाची पुनर्निवादा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

                                                – शंकर गोरे, महापालिका आयुक्त

 

Back to top button