कपाशी बियाणे विक्रीचा ‘बाजार’, बाईकसह अनेक बक्षिसांची खैरात | पुढारी

कपाशी बियाणे विक्रीचा ‘बाजार', बाईकसह अनेक बक्षिसांची खैरात

नगर : पुढारी वृत्तसेवा

गेल्या वर्षी दहा हजारांचा उच्चांकी भाव मिळाल्याने यंदा कपाशीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर विविध कंपन्यांनीही आपले कपाशीचे बियाणे मार्केटमध्ये आणले आहे. काही कंपन्यांनी कृषी केंद्रचालकांना जास्तीत जास्त विक्रीवर परदेश वारीसह अन्य ‘ऑफर’ दिल्या आहेत.

Nepal Tara Air plane crash | २२ प्रवाशांसह कोसळलेल्या नेपाळच्या विमानाचे अवशेष सापडले, फोटो आला समोर

तर काही कंपन्यांकडून थेट शेतकर्‍यांना बियाणे खरेदीवर लॉटरीचे आमिष दाखवले आहे. दरम्यान, जास्त विक्री आणि जास्त नफ्याच्या आमिषाने जिल्ह्यात बोगस बियाणेही विकले जाऊ शकते, असेही संकेत मिळत आहेत. कपाशी हे नगदी पीक आहे. गेल्यावर्षी कपाशीने चांगलाच भाव खाल्या. त्यामुळे यंदाही कपाशी लागवडीसाठी शेतकर्‍यांनी मशागतींना वेग दिला आहे. ही संधी पाहून विविध कंपन्या देखील आपले कपाशीचे बियाणे घेऊन मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत.

94 नुमने प्रयोगशाळेत रवाना

जिल्हा परिषदेचा कृषी विभाग हा बियाणे खरेदीत शेतकर्‍यांची फसगत होऊ नये, यासाठी वॉच ठेवून आहे. कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्या मार्गदर्शनात मोहीम निरीक्षक अमृत गांगुर्डे यांच्या पथकाने काही दुकानांची झाडाझडतीही घेतली आहे. तत्पूर्वी कपाशीसह सोयाबीन, तूर, मूग इत्यादी बियाणांचे 94 नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्यांची उगवण क्षमता पाहूनच ते बियाणे विक्रीसाठी खुले केले जाणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात बोगस बियाणांना आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.

धनदेव, राशी, भक्ती मल्लिकासह ‘सैराट’ !

एमआरसी 7351, बलराज, जंगी, धनदेव, पाषण, मल्लिका, नवनीत, भक्ती, हिमा, फ्लक्स बीटी, भास्कर, ताकद, प्रचंड भास्कर, धडक, सैराट, यशोदा वाण, चॅम्पियन, अतिश, एटीएम, जाद्, जॅकपॉट, मनी मेकर, रुद्रा, कॅश, अजित, चिरंजीवी, विक्रम, अवतार, विठ्ठल इत्यादी वाण घेऊन 40 कंपन्या मार्केटमध्ये स्पर्धा करत आहेत.

‘पुढारी’मुळे बंधार्‍याच्या पुलाची दुरुस्ती सुरु : रखडलेला प्रश्न मार्गी

परदेश वारीसह खूप काही..!

काही कंपन्यांनी कृषी केंद्र चालकांना आपल्या बियाणाची 1 ते 5 टन विक्री केली, तर त्यांना परदेशी वारी, बुलेट, फ्रिज, रोख बक्षिस, विविध सवलती अशा ऑफर देऊ केल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही दुकानदार हे शेतकर्‍यांना तसे पटवून देण्यासाठीही जीवाचा आटापिटा करताना दिसत आहेत. यातून मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारले जाऊ शकते, अशीही शंका आहे.

मोफत लॉटरीच्या तिकिटांचे वाटप

दुसरीकडे काही कंपन्यांनी गावोगावी कॅम्प सुरू केले आहेत. राहुरी तालुक्यात कपाशीचे क्षेत्र अधिक असल्याने येथे कंपन्या डेरेदाखल आहेत. शेतकर्‍यांना लॉटरीचे तिकीट दिले जात आहे. हे तिकीट कपाशीचे बियाणे खरेदी करताना कृषी केंद्र चालकाला द्यायचे आहे, तो अर्धे तिकीट पुन्हा शेतकर्‍याकडे देईल, त्यानंतर ड्रॉ होऊन त्याचा निकाल फोनवर कळविला जाणार आहे. अशाप्रकारे कंपन्यांचे लोकं शेतकर्‍यांच्या भेटी घेवून मोफत लॉटरी तिकीट देत आहे.

सातारा-स्वारगेट मार्गावर ई-शिवाई बस : 85 बसची महामंडळाकडे मागणी

बजाज प्लॅटिनासह बक्षिसांची खैरात

कपाशी बियाण्यांच्या अनेक कंपन्या स्पर्धेत उतरलेल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना आपले बियाणे खरेदीसाठी कंपन्या प्रयत्नशील आहेत. शेतकर्‍यांनी संबंधित कंपन्यांचे बियाणे खरेदी केल्यानंतर त्यांचा लॉटरीचा नंबर लागलाच, तर त्यास पहिले बक्षीस हे बजाज प्लॅटिना, दुसरे बक्षीस वॉशिंग मशीन, एलसीडी, सिलिंग फॅन, चांदीची नाणी अशी हजारोंच्या संख्येत बक्षिसांची खैरात केली जात आहे.

कपाशीचे 442 क्विंटल बियाणे उपलब्ध

जिल्ह्यात यावर्षी 1 लाख 20 हजार हेक्टरपर्यंत कपाशीची लागवड होण्याचा अंदाज आहे. त्यासाठी 2100 क्विंटल बियाणाची गरज आहे. मात्र, आठ दिवसांवर लागवडी आल्या, तरी सध्या फक्त 442 क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. यात सर्व बियाणे हे खासगी कंपनीचे आहे. बियाणांचा पुरवठा धिम्या गतीने असल्याने यात कृत्रिम टंचाई दाखवून काळाबाजार होण्याचीही भीती आहे. शिवाय लागवडी वेळेवर करण्याच्या धावपळीत बळीराजाचा बोगस बियाणामध्येही बळी जाऊ शकतो.

खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांनी बियाणे खरेदी करताना अधिकृत कंपन्यांचे बियाणे खरेदी करावे. त्याचे कृषी केंद्र चालकाकडून पक्के बिल घ्यावे, ते जपून ठेवावे. तसेच पाऊस झाल्यानंतरच लागवडी कराव्यात. बियाणांबाबत काही तक्रार असल्यास कृषी विभागाशी संपर्क करावा. – शंकर किरवे कृषी अधिकारी

 

Back to top button