Nepal Tara Air plane crash | २२ प्रवाशांसह कोसळलेल्या नेपाळच्या विमानाचे अवशेष सापडले, फोटो आला समोर | पुढारी

Nepal Tara Air plane crash | २२ प्रवाशांसह कोसळलेल्या नेपाळच्या विमानाचे अवशेष सापडले, फोटो आला समोर

काठमांडू; पुढारी ऑनलाईन

नेपाळच्या तारा एअरचे ९ एनएईटी या प्रकारातील डबल इंजिन विमान (Nepal Tara Air plane crash) सनोसवेअर, थासांग-२, मस्तंग येथे कोसळले आहे. या विमानात चौघा भारतीयांसह २२ जण होते. विमानातील चारही भारतीय मुंबईचे आहेत. दरम्यान, नेपाळ पोलिसांचे पथक दुर्घटनास्थळी पोहोचले आहेत. विमानातील काही प्रवाशांचे मृतदेह ओळखण्याच्या पलीकडे गेले आहेत. पोलीस विमानाचे अवशेष आणि प्रवाशांचे मृतदेह ताब्यात घेत आहेत. तसेच नेपाळ आर्मीने विमान ज्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झाले तेथील फोटो जारी केला आहे. त्यात विमानाचे अवशेष दिसत आहेत. हवाई आणि जमीन या दोन्ही मार्गाने शोध आणि बचाव पथके अपघाताच्या ठिकाणी जात आहेत, अशी माहिती मस्तंगचे मुख्य जिल्हा अधिकारी नेत्रप्रसाद शर्मा यांनी दिली आहे.

गेल्या १३ वर्षात तारा एअरला ३ मोठे अपघात (Nepal Tara Air plane crash)  झाले आहेत. रविवारी उड्डाणानंतर पंधरा मिनिटांतच या विमानाचा हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता आणि काही काळातच ते दुर्घटनाग्रस्त झाले. विमानचालकाकडील मोबाईल फोनमुळे हे विमान नेमके कुठे कोसळले याचा पत्ता लागला. हे विमान पोखराहून जोमसोमकडे निघाले होते. तारा एअरचे विमान सर्वात शेवटी मस्तंग जिल्ह्यात दिसले होते, अशी माहिती जिल्हाधिकारी नेत्रप्रसाद शर्मा यांनी काल दिली होती.

विमानात १३ नेपाळी, २ जर्मन, ४ भारतीय नागरिक आणि ३ कर्मचारी होते. अशोक कुमार त्रिपाठी, धनुष त्रिपाठी, रितिका त्रिपाठी आणि वैभवी त्रिपाठी अशी या विमानातील चौघा भारतीय प्रवाशांची नावे असून, चौघेही एकाच कुटुंबातील आहेत.

पोलिस अधिकारी रमेश थापा यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून येथे पाऊस पडत असला तरी सर्व उड्डाणे सुरळीत सुरू होती. दरीत उतरण्यापूर्वी विमाने डोंगरातून उडतात. पर्वतीय पायवाटेवर ट्रेकिंग करणार्‍या परदेशी गिर्यारोहकांमध्ये हा परिसर प्रसिद्ध आहे. या मार्गावरून भारतीय आणि नेपाळी यात्रेकरू मुक्‍तिनाथ मंदिरालाही भेट देतात.

Back to top button