

वेणेगाव; पुढारी वृत्तसेवा : सातारा तालुक्यातील अतीत- मत्यापूर दरम्यान असणार्या उरमोडी नदीच्या बंधार्यावरील पुलाच्या लोखंडी रेलिंग व काँक्रिटीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू झाले आहे. दै. 'पुढारी'ने आवाज उठवल्यामुळे रखडलेला हा प्रश्न अखेर मार्गी लागला असून पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनीही त्यासाठी मोठे योगदान दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी दै. 'पुढारी' व पालकमंत्र्यांना धन्यवाद दिले.
अतीत- मत्यापूर दरम्यान उरमोडी नदीच्या बंधार्यावरील पूल वाहतुकीला धोकादायक बनला होता. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने बंधार्यावरील रेलिंग, संरक्षक कठडे वाहून गेले होते. तसेच बंधार्याचे नुकसान झाले होते. बंधार्यावरून जात असताना काही दिवसांपूर्वीच मत्यापूर येथील एका माजी सैनिकाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे दै. 'पुढारी'ने आपल्या खास शैलीत पाटबंधारे विभागाची उदासीनता प्रकर्षाने मांडली. 'मत्यापूर- अतीत बंधार्यावरील पूल जीवघेणा' या मथळ्याखाली सचित्र बातमी प्रसिध्द करुन यंत्रणेचे लक्ष वेधले. दै. 'पुढारी'च्या या वृत्ताची पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना खडेबोल सुनावत तातडीने या बंधार्याच्या दुरूस्तीचे आदेश दिले. या घटनेनंतर तात्काळ बंधार्याची दुरूस्ती सुरू झाली. सध्या रेलिंग बसवण्याचे काम गतीने हाती घेण्यात आले आहे. संरक्षण कठडे, काँक्रिटीकरण कामाला सुरुवात झाल्याने येथील ग्रामस्थ व वाहनचालक सुखावून गेले आहेत. याप्रश्नी ग्रामस्थांनीही वारंवार पाठपुरावा केला होता.
जि.प.चे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, अतीतचे सरपंच तानाजीराव जाधव, उपसरपंच वैशाली पाटील तसेच मत्यापूर येथील सरपंच मंगल घोरपडे, उपसरपंच राजेंद्र घोरपडे, प्रकाश घोरपडे, जितेंद्र घोरपडे आदी ग्रामस्थांनी बंधार्याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला होता. दै. 'पुढारी' ने हा प्रश्न उचलून धरल्यानंतर ना. बाळासाहेब पाटील यांनीही तातडीने संबंधितांना सूचना दिल्या. त्यामुळे हा प्रश्न अखेर मार्गी लागला. परिसरातील ग्रामस्थांनी दै. 'पुढारी' व ना. बाळासाहेब पाटील यांचे आभार मानले आहेत.