Nashik | लाच प्रकरणातील ‘पुरातत्त्व’चे संचालक गर्गे फरार, आळेंच्या घरातून तीन लाखांची रोकड जप्त | पुढारी

Nashik | लाच प्रकरणातील 'पुरातत्त्व'चे संचालक गर्गे फरार, आळेंच्या घरातून तीन लाखांची रोकड जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य पुरातत्त्व आणि संग्रहालय संचालनालयाचे नाशिक येथील पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालक संशयित आरती मृणाल आळे (४१, रा. अनमोल नयनतारा, राणेनगर) यांना दीड लाख रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. ७) रंगेहाथ पकडले. तर विभागाचे संचालक डॉ. तेजस मदन गर्गे यांनी लाचेच्या रकमेतून त्यांचा हिस्सा घेण्यास संमती दिल्याने त्यांच्या विरोधातही इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून गर्गे फरार असल्याचे विभागाने सांगितले. विभागाने त्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई, पुणे येथे पथके रवाना केली आहेत.

हिरावाडीतील तक्रारदाराने आरती आळे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांना आशेवाडी येथील रामशेज किल्ल्याजवळ ११ वर्षांसाठी कराराने कंपनी टाकण्यासाठी पुरातत्त्व विभागाचा ना हरकत दाखला (एनओसी) हवा होता. त्यासाठी त्यांनी तंत्र सहायक व अतिरिक्त पदभार असलेल्या सहायक संचालक आरती आळे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी आळे यांनी तक्रारदाराकडे दीड लाखाच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार ‘एसीबी’च्या पथकाने सापळा रचून मंगळवारी (दि. ७) आळे यांना अनमोल नयनतारा गोल्ड अपार्टमेंट येथे राहत्या घरी लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. सखोल तपासात या लाचेत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांचाही वाटा असल्याचे उघड झाले. आरती यांनी फोनवरून गर्गे यांच्याशी संपर्क साधला असता गर्गे यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार विभागाने इंदिरानगर पोलिस ठाण्यात गर्गे व आळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एन. बी. सूर्यवंशी व सुवर्णा हांडोरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

आळे यांना नाेटीस
आरती आळे यांची दोन आठवड्यांपूर्वीच प्रसूती झाली आहे. त्यामुळे त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक न करता नोटीस दिली आहे. त्यात विनापरवानगी शहर सोडू नये, तपासात सहकार्य करावे व तक्रारदारावर दबाव आणू नये, पुरावे नष्ट करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच आळे यांच्या घरझडतीत तीन लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

गर्गे यांचे घर सील
गर्गे हे मुंबईत राहतात. मात्र कारवाई झाल्यापासून ते फरार असल्याने ‘एसीबी’ने त्यांचे मुंबईतील घर सील केले आहे. तसेच पुणे येथेही तपास सुरू आहे. आळे ज्या फ्लॅटमध्ये राहतात, तो फ्लॅटही गर्गे यांच्या मालकीचा असल्याचे विभागाने सांगितले. त्यामुळे गर्गे यांचा ताबा मिळाल्यानंतर गर्गे यांच्या घरांची झडती घेतली जाणार आहे.

‘बॅक डेटेड’ प्रमाणपत्र
आरती आळे या प्रसूतीसाठी रजेवर होत्या. त्यामुळे तक्रारदार याने तुम्ही प्रमाणपत्र कसे देणार, असा सवाल केला होता. त्यावर आम्ही तुम्हाला मागील तारखेचे प्रमाणपत्र देऊ, त्यासाठी दीड लाख रुपये द्या, असे आरती यांनी तक्रारदारास सांगितले. विभागाच्या चौकशीत हे प्रमाणपत्र तयार होते, फक्त लाचेची रक्कम न मिळाल्याने त्यांनी तक्रारदारास दिले नसल्याचे उघड झाले.

हेही वाचा:

Back to top button