Satara Lok Sabha Election 2024 : उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील | पुढारी

Satara Lok Sabha Election 2024 : उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील

सातारा, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. सातार्‍याची शान, अभिमान असलेले उदयनराजे हे नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिल्लीत दिसले पाहिजेत. कोल्हापूरची जशी तशी सातार्‍याचीही गादी आहे, पण शरद पवार हे कोल्हापूर आणि सातार्‍यात दुटप्पीपणाने वागत आहेत. शौचालयात पैसे खाल्ले असा उमेदवार पवारांनी विरोधात उभा केला. उदयनराजे तुतारीची पिपाणी केल्याशिवाय राहणार नाहीत. नरेंद्र मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी उदयनराजेंना साथ द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी सभेत केले. दरम्यान, सातार्‍यात आयटी हब, एमआयडीसी व वंदे भारत यासाठी नरेेंद्र मोदींना साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

सातारा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी सातारा तालीम संघ मैदानावर निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्राम विकास मंत्री ना. गिरीष महाजन, पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, खा.श्री.छ. उदयनराजे भोसले, ना. महेश शिंदे, माजी मंत्री महादेव जानकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. देवयानी फरांदे, आ. नरेंद्र पाटील, माजी आमदार मदनदादा भोसले, धैर्यशील कदम, डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, पुरुषोत्तम जाधव, अशोक गायकवाड, अमित कदम, चंद्रकांत जाधव, सौरभ शिंदे, चित्रलेखा माने-कदम, सुरभी भोसले, सुवर्णा पाटील, रेणू येळगावकर, संदीप शिंदे आदि प्रमुख उपस्थित होते.

ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वराज्याची, क्रांतीची, शौर्याची असलेली सातार्‍याची भूमी आहे. सातार्‍याच्या विकासाची ब्लू प्रिंट उदयनराजे यांनी तयार केली आहे. विकासाच्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी तेवढ्याच ताकदीच्या नेतृत्वाची आवश्यकता असून ते नेतृत्व देण्याची क्षमता नरेंद्र मोदी यांच्यात आहे. मोदींनी 10 वर्षांत भारताला आयटी कॅपिटल केल्यामुळे सातारा आयटी हब होऊ शकते. जगातील सर्व आयटी कंपन्या भारतात आहेत. दोन्ही महाराजांनी सांगितल्यावर आयटी पार्क, एमआयडीसी, वंदे भारत ट्रेन, काँक्रेट रस्ते यांच्यासाठी मोदींसोबत आपला प्रतिनिधी लागणार आहे. आमच्यासोबत आ. शिवेंद्रराजे आहेतच. महाराष्ट्राची एक किल्ली तुमच्याकडे आहे. देशाची किल्ली मिळवण्यासाठी उदयनराजेंना लोकसभेत पाठवावे लागेल. लोकसभेत आपला खासदार नसताना सातारा लोकसभा मतदारसंघात 10 हजार कोटींची कामे आली. सातार्‍यातून उदयनराजेंना खासदार केलं तर कितीतरी हजार कोटींची कामे येऊ शकतात.

लोकसभेची निवडणूक देशाची आहे. सर्वसामान्यांची अपेक्षा पूर्ण करणारा नेता याच निवडणुकीतून ठरवला जाणार आहे. देशात दोन ध्रुव तयार झाले आहे. विश्वगौरव, विकासनेते नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, महादेव जानकर यांची रासप, मनसे, रिपाइं, पीडीप, जनसुराज्य असे 18 पक्ष असलेली महायुती आहे. दुसरीकडे राहूल गांधी आहेत. यांच्याकडे पर्याय नाहीत. शरद पवार प्रधानमंत्री होणार नाहीत. उद्धव ठाकरेंचा प्रश्न सुटत नाही. त्यामुळे उदयनराजेंना दिलेलं मत नरेंद्र मोदींना मिळतं. इतर कुणाला दिलेलं मत राहूल गांधींना मिळतं. महायुतीची विकासाची गाडी असून तिचं मजबूत इंजिन मोदीजी आहेत. या गाडीला विकासाच्या बोगी लागल्या आहेत. राहूल गांधींच्या गाडीला इंजिन आहे पण डब्बे नाहीत. महाविकास आघाडीच्या इंजिनमध्ये सर्वसामान्यांना बसायला जागाच नाही, अशी टीका केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांनी देशात परिवर्तन केले. संपूर्ण जग मोदी मॉडेलची चर्चा करत आहेत. 25 कोटी लोक दारिद्र रेषेवर आले. 20 कोटी कुटुंबांना पक्के घर, 50 कोटी कुटुंबांना गॅस कनेक्शन्स, 55 कोटी कुटुंबांना शौचालय, 60 कोटी कुटुंबांना नळकनेक्शन्स, 80 कोटी कुटुंबांना मोफत रेशन, 60 कोटी युवकांना कर्ज, 80 लाख बचत गटांना 8 लाख कोटी दिले. 2029 साली 33 टक्के महिला आमदार व खासदार होणार आहेत. नरेंद्र मोदींनी गावगाड्याचा विचार करत विश्वकर्मा योजनेला 14 हजार कोटी दिले. अनुसूचित जातीसाठी स्टँड अप योजना, आदिवासींसाठी 24 हजार कोटींची योजना, 50 हजार कोटी देऊन सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन योजना राबवली. शेतकर्‍यांसाठी सिंचनाचे मोठे काम झाले. महाराष्ट्रासाठी 50 हजार कोटी दिले. सातारा जिल्ह्यात पाच वर्षात 5 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले. उरमोडी प्रकल्प केंद्राच्या बळीराजा योजनेत समाविष्ट केला. प्रधानमंत्री कृषी सिंचनमध्ये धोम बलकवडी, तारळी, वांग, मोरणा, कुडाळी, जिहे-कठापूर, टेंभू, वसना वांगणा योजनांचा समावेश केला. ना. महेश शिंदे यांनी या योजनांच्या माध्यमातून गावोगावी पाणी पोहोचवलं. म्हणून लोकांनी त्यांना पाणीदार केलं आणि दुसर्‍याला घरी बसवलं. महाराज त्यांना पुन्हा घरी बसवणार आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतकर्‍यांची चिंता मोदींना आहे. आघाडी सरकार असताना अनुशेषाचे कारण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला सांगितलं जायचं. निधी कुणालाच दिला जात नव्हता. महायुतीचे सरकार आल्यानंतर सातारा, सांगली आणि सोलापूरच्या दुष्काळी भागात पाणी पोहोचले आहे. मोदींचे सरकार असल्यामुळे हे शक्य झाले. मोदी पंतप्रधान झाले त्यावेळी मोदींना ऊसातलं, साखर कारखानदारीतलं काय कळतं असं ’जाणते राजे’ म्हणाले होते. एफआरपी, इथेनॉल पॉलिसी, कारखान्यांचा 10 हजार कोटींचा टॅक्स माफ असे ऊस शेतकरी व साखर कारखानीसंदर्भात सर्वाधिक निर्णय मोदी सरकारने घेतले. शेतकर्‍यांसाठी मोदींनी कायदाच मोडला. पण शरद पवार यासाठी 5 वेळा मनमोहन सिंग यांना भेटले, कारखानदार कोर्टात गेले पण काहीच उपयोग झाला नव्हता.
खा.उदयनराजे भोसले म्हणाले, काँग्रेसकडे 55 वर्षे सत्ता होती. आपण त्यांना भरभरुन मतदान केले. मात्र त्यांनी जाणीवपूर्वक देशाकडे दुर्लक्ष केले. काँग्रेसमध्ये एवढा अहंकार निर्माण झाला होता की, लोक आपल्याला विरोध करत आहेत? मात्र तो विरोध नव्हता तर ते आपला अधिकार मागत होते. काँग्रेसने इर्मजन्सी (आणिबाणी) लागू केली लोकांना तुरुंगात टाकले आणि संपूर्ण चिरडण्याचे पाप केले. काँग्रेसने संविधानाचा गळा कापण्याचे काम केले.

गेल्या दहा वर्षाचा कालावधी आपण पाहिला तर परिवर्तन घडले. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात तालुक्यात विकासाचे डोंगर पहायला मिळत आहेत. महिलांचे सक्षमीकरण, तरुणांच्या रोजगाराबाबतीत मेक इन इंडिया, स्पोर्टस अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक योजना राबवल्या गेल्या व त्याचा फायदा संपूर्ण देशवासियांना झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली पाच वर्षात संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये 10 हजार कोटी रुपयांची कामे मार्गी लागली. ज्यावेळी स्थिर सरकार असते त्यावेळी नियोजन आखले जाते. नियोजनबध्द कार्यक्रम ज्याठिकाणी असतो त्यावेळेसच लोकांच्या प्रगतीची कामे मार्गी लागतात. आपण विकासाच्या कामामध्ये जे बोलतो त्यामध्ये पर्यटन, आयटी पार्क यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्याच्या जागेबाबत आपण लवकरच निर्णय घेणार आहोत. सातारा जिल्ह्यातून कृष्णा नदी जात असून तिच्या शुध्दीकरणाचे काम आपण हाती घेणार आहे. नमो गंगाच्या धर्तीवर ’जय जय कृष्णे’ अशी मोहिम राबवणार आहे. एमआयडीसीच्या बाबतीतही रोजगार मिळण्यासाठी शिवेंद्रराजे प्रयत्नशील आहेतच त्याबाबत विचार विनिमय करुन उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावून तोही प्रश्न सोडवला जाणार आहे. असेही उदयनराजे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन हे कोणत्या मोठ्या घरात जन्माला आलेले नाहीत. त्यांच्या कर्तबगारीमुळे भाजपने त्यांना दाद दिली. मी व शिवेंद्रराजे यांनी मागील जन्मी काहीतरी पुण्याचे काम केले असेल म्हणून मोठया घराण्यात आमचा जन्म झाला. आम्ही घराण्याचे नाव घेवून कधी मत मागितली नाहीत आणी मागणारही नाही. आम्ही लोकशाही मान्य केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीचा ढाचा रचला आहे. आम्ही लोकांसमोर जेव्हा जातो तेव्हा एकच सांगतो, तुम्ही जेव्हा निवडून दिलं तेव्हा संबंधित कामे मार्गी लावली हे दाखवतो, असेही उदयनराजे म्हणाले.

आ.शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, ज्यांनी आपल्याला भरभरुन दिले राज्याच्या तिजोरीची दारे उघडी ठेवली व सातारा, जावलीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी वेगवेगळ्या कामांसाठी वाटला ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आले आहेत. ही निवडणूक स्थानिक नाही. ही निवडणूक आपल्या हेव्यादाव्यांची किंवा इथल्या राजकारणाची नाही. ही निवडणूक देशाची आहे. आपल्या एका मताने भारताचे पंतप्रधान. देशाची जबाबदारी. देशाचा विकास आणि देशाच संरक्षण हे कोणाच्या हातात जाणार आहे हे आपणाला ठरवायचे आहे. यामुळे ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्तावर बसवायचे आहे. यासाठी आपल्याला ही निवडणूक हातात घ्यायची आहे.

ना. महेश शिंदे म्हणाले, राज्य सरकारच्या अनेक योजना सातारा जिल्ह्यात आणल्या जात आहेत. गतवेळी आमची चुक झाली. आमच्या चुकीमुळे राजेंना थोडी माघार घ्यावी लागली होती. आता मात्र ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. जनताच सांगत आहे की आमचा राजाला पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर संसदेत पहायचे आहे. आता इतिहास घडवण्यासाठी जनता सज्ज आहे. आज विरोधकांकडे विकासाचा कोणताच मुद्दा नाही. 40 वर्षामध्ये त्यांनी काही केलेच नाही. महादेव जानकर, सुरभी भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

शरद पवार दुटप्पी

शरद पवार हे दुटप्पीपणे वागत आहेत. सातार्‍याच्या गादीचा मान राखून त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करणार नाही असे पवारांनी सांगायला हवे होते. शौचालयात पैसे खाल्ले असा उमेदवार पवारांनी विरोधात उभा केला. महाराजांविरोधात उमेदवार उभा करताना तोडीचा उमेदवार द्यायचा ना. सातार्‍यात उदयनराजे तुतारीची पिपाणी केल्याशिवाय राहणार नाहीत. दोन्ही राजे एकत्र आहेत. त्यामुळे सातारा मतदारसंघातून रेकॉर्ड करावे. छत्रपती शिवरायांच्या भूमीचा हुंकार हा देशाचा झाला पाहिजे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.

Back to top button