Weather Update : पुणे गारठले, राज्यात नीचांकी तापमान | पुढारी

Weather Update : पुणे गारठले, राज्यात नीचांकी तापमान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : थंड हवेसाठी प्रसिद्ध असणारे महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच गारठले. गुरुवारी तेथील पारा 10.6 तर पुणे शहराचे तापमान 10.9 अंशांवर आले होते. गुरुवारी राज्यातील बहुतांश शहरे गारठली असून 7 फेब्रुवारीपर्यंत असे वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तामिळनाडू किनारपट्टी ते मराठवाडा-विदर्भ असा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.तसेच हिमालयापासून आसाम राज्यातील काही भागात बर्फवृष्टी सुरू आहे. उत्तर भारतात किमान तापमान झोतवार्यांच्या प्रभावामुळे अजूनही 2 ते 7 अंशावर खाली आले आहे त्यामुळे महाराष्ट्रात थंडीची लाट पुन्हा तीव्र झाली आहे.गुरुवारी राज्य पुन्हा गारठण्यास सुरुवात झाली.

महाबळेश्वरचा पारा प्रथमच 10 अंशावर..

यंदा महाबळेश्वर या थंडहवेच्या ठिकाणाचा पारा प्रथमच 10.6 अंशावर खाली आला हे विशेष.कारण यंदाच्या हिवाळ्यात तेथील किमान तापमान सतत 12 ते 14 अंशावर होते.विदर्भ,मराठवाडा भागातील शहरांचे तिपमान महाबळेश्वर पेक्षा कमी होते.हिवाळा संपताना थंडहवेचे ठिकाण प्रथमच गारठले.

हा प्रभाव देखील झोत वार्‍यांचा परिणाम आहे. हवेच्या वरच्या थरांतील वार्‍यांचा वेग हा सतत 130 ते 140 नॉट इतका आहे. त्यामुळे उत्तर भारत सतत गारठला आहे. यंदा यामुळेच उत्तर भारतात विक्रमी थंडीची नोंद झाली आहे. महाराष्ट्रावरही त्याचा परिणाम होत असून
7 फेब्रुवारीपर्यंत हा प्रभाव राहिल. राज्यात पुणे जिल्हा सर्वांत जास्त गारठला आहे.

– अनुपम कश्यपि, हवामान विभाग प्रमुख, पुणे वेधशाळा

जेट स्ट्रीम विंन्डमुळे थंडी कमी होईना..

हवेच्या वरच्या थरात यंदा जोरदार वारा वाहत आहे. त्याला हवामान विभागाने जेट स्ट्रीम विंन्डस (झोतवारा)असा शास्त्रीय शब्दप्रयोग वापरत आहे. हा वारा पूर्वेकडे वाहतो व फक्त हिवाळ्यात आढळतो. सध्या तो उत्तर भारतावर आहे. तसेच मराठवाडा व विदर्भात सुरू झाला आहे. झोतवार्‍याच्या निर्मितीस व त्यातील वार्‍याच्या दिशेला पृथ्वीचे परिवलन, ऋतू, पृथ्वीवरील तापमानाच्या वितरणातील भिन्नता हे घटक कारणीभूत असल्याचे मानले जाते. झोतवार्‍याचा परिणाम हवामान, हवाई वाहतूक आणि वातावरणातील इतर घटकांवर होतो. दुसर्‍या महायुद्धापर्यंत झोतवारे व्यापकपणे माहीत झालेले नव्हते. त्या काळात अमेरिकी व जर्मन वैमानिकांना त्यांचा अतिउंच ठिकाणी प्रत्यय आला. झोतवार्‍यांमधून जाणार्‍या विमानाच्या गतीवर या जोरदार वार्‍यांचा मोठा परिणाम होऊ शकतो.

गुरुवारचे राज्याचे तापमान

महाबळेश्वर 10.6, पुणे 10.9, नगर 12.5, जळगाव 11.1, कोल्हापूर 16.3, मालेगाव 14.4, नाशिक 11.8, सांगली 15.5, सातारा 11.2, सोलापूर 18.8, धाराशीव 19, छत्रपती संभाजीनगर 15.8, परभणी 16.7, नांदेड 19, बीड 16.5, अमरावती 16.7, बुलढाणा 15, चंद्रपूर 16.6, गोंदिया 17.2, नागपूर 17.2, वाशिम 15.2, वर्धा 17.6.

पुणे शहर-जिल्ह्यात 24 तासांत 4 ते 8 अंशांनी घट

पुणे शहरातील किमान तापमानात गेल्या 24 तासांत 4 ते 6 अंशांनी घट झाली आहे. तर, जिल्ह्यात तब्बल 5 ते 10 अंशांनी घट झाली आहे. गुरुवारी जिल्ह्यात सर्वात कमी तापमान शिरूर 8.7, हवेली तर पुणे शहरातील एनडीए भागाचे 9.8 अंशांवर खाली आले होते.

हेही वाचा

Back to top button