नागपूरमध्ये मराठा आरक्षण सर्वेक्षक महिला बेशुद्ध; सहकाऱ्यांसह नागरिक धावले मदतीला | पुढारी

नागपूरमध्ये मराठा आरक्षण सर्वेक्षक महिला बेशुद्ध; सहकाऱ्यांसह नागरिक धावले मदतीला

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाची माहिती संकलीत करीत असलेल्या सर्वेक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी एका सर्व्हेअरला डेटा गोळा करीत असताना कुत्रा चावला होता. भटका कुत्रा चावल्याने त्याला सुटी द्यावी लागल्याची घटना घडली. आज (दि. १) आणखी एक घटना जोग ले-आऊट, प्रशांत नगर, अजनी स्क्वेअर येथे घडली. शिक्षक, इतर सर्वेक्षकांसह त्या भागाचे सर्वेक्षण करीत असताना एका महिला सर्वेअरला वाहनाची धडक बसली. काही वेळानंतर ती लोकांशी बोलत असताना बेशुद्ध पडली. जवळच्या इमारतींचे सुरक्षा रक्षक आणि सहकारी सर्व्हेअर यांनी मदत केली. महिलेचा श्वास घेणेही बंद झाले होते. सुरक्षा रक्षक आणि सहकारी सेवकांनी हृदयाचे पंपिंग केले. त्यानंतर तिने श्वास घेण्यास सुरुवात केली.

रुग्णवाहिका पोहोचेपर्यंत सुमारे ४५ मिनिटे ती महिला बेशुद्ध होती. आजूबाजूच्या लोकांनी आणि इतर सर्वेक्षकांनी तिला मदत करण्याचा प्रयत्न केला. उशीरा पोहोचलेली रुग्णवाहिका देखील औषधे आणि परिचारिकांनी भरलेली होती. यामध्ये रुग्णासाठी जागा नव्हती. आणि आत कोणत्याही प्रकारच्या सोयी नव्हत्या. रक्षक आणि आजूबाजूच्या लोकांनी रुग्णाला रुग्णवाहिकेत ठेवण्यात मदत केली.राज्य आयोगामार्फत मराठा आणि बिगर मराठा खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्व शिक्षक, शिक्षिका, एमएमसी अधिकारी, पीडब्ल्यूडी कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि तलाठी हे सर्वेक्षणात गुंतले आहेत. त्यांना अनेक अडचणी येत असल्याने महापालिका आयुक्तांनी याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Back to top button