अंतरिम अर्थसंकल्पाचे शेअर बाजारात थंड स्वागत

अंतरिम अर्थसंकल्पाचे शेअर बाजारात थंड स्वागत

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात नव्या भारताचे आश्वासक चित्र उभे केले. मात्र, भारतीय शेअर बाजाराने या अर्थसंकल्पाचे अत्यंत थंड स्वागत केले. सेन्सेक्स 107 आणि निफ्टी 28 अंकांनी खाली आला.
बुधवारी सेन्सेक्स 612 आणि निफ्टी 204 अंकांनी वधारला होता. शेअर निर्देशांकात घट झाल्याने सलग सातव्या सत्रात शेअर निर्देशांकात दिवसाआड वध-घट होण्याचा क्रम गुरुवारीही (दि. 1) कायम राहिला. गुरुवारी सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सेन्सेक्सने उसळी घेतली होती. सेन्सेक्स 72,151 अंकांवर जाऊन आला. त्यानंतर 71,574 अंकांच्या पातळीवर गेला. बाजार बंद होताना सेन्सेक्स 71,645 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) निफ्टी 21,800 अंकांवर गेला होता. बाजार बंद होताना निर्देशांक 0.13 टक्क्याने घटून 21,697 अंकांवर बंद झाला.

बीएसईत मारुतीच्या शेअरने चार टक्क्यांची उसळी घेतली. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, अ‍ॅक्सिस बँक, एसबीआय आणि एनटीपीसीच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली. लार्सन अँड टुब्रो आणि अल्ट्राटेक सिमेंटचा शेअर दोन टक्क्यांनी कोसळला. जेएसडब्ल्यू स्टील, टायटन, बजाज फायनान्स, विप्रो, टेक महिंद्रा, नेस्ले, भारती एअरटेल आणि एशियन पेंटस् या कंपन्यांचे शेअर गडगडले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात किरकोळ घट झाली.

अर्थसंकल्प अन् शेअर बाजार

अर्थसंकल्पातील घोषणांचे पडसाद शेअर बाजारावर उमटत असतात. गेल्यावर्षी (2023) अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजार 0.27 टक्क्याने घसरला होता; तर 2015 मध्ये अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार 0.48 टक्क्याने, 2017 मध्ये 1.76 टक्के, 2019 मध्ये 0.59 टक्के आणि 2022 मध्ये 1.46 टक्के वाढला होता; तर 2021 मध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजाराने तब्बल 5 टक्क्यांनी उसळी घेतली होती. तसेच 2016 मध्ये 0.18 टक्के, 2018 मध्ये 0.16 टक्के, 2019 मध्ये 0.99 टक्के आणि 2020 मध्ये 2.43 टक्के घट नोंदवली गेली. गुरुवारी झालेल्या सत्रात निर्देशांकात किरकोळ 0.14 टक्क्याची घट झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news