उजनीतून सिंचनासाठी पाणी मिळणे सध्या अवघडच | पुढारी

उजनीतून सिंचनासाठी पाणी मिळणे सध्या अवघडच

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा आज केवळ 15 टक्के आहे. सप्टेंबरमध्ये पुणे जिल्ह्यात पर्जन्यवृष्टी न झाल्यास धरणांतील पाणीसाठा वाढण्यास मर्यादा येतील. त्याचा परिणाम सोलापूर जिल्ह्यातील शेतीच्या पुढील वर्षाच्या सिंचनावर होणार आहे. सध्याचा पाणीसाठा केवळ पिण्यासाठी पुरेल इतकाच आहे. सोलापूर जिल्ह्यात 43 साखर कारखाने असून, त्यांच्यातील बहुतेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस उजनी धरणातील पाण्यावर अवलंबून आहे.

पुणे जिल्ह्यातील चार कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातही धरणाच्या जलाशयातून पाणी घेतले जाते. उजनी धरणातून सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी पुरविले जाते. गेल्या वर्षी उजनी भरल्यामुळे सुमारे 60.57 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी शेतीच्या तिन्ही हंगामातील सिंचनासाठी पुरविण्यात आले. आज धरणातून उपयुक्त पाणीसाठा केवळ आठ टीएमसी आहे.

नऊ धरणांतून पाणी उजनी जलाशयाकडे येते. यंदा ऑगस्ट संपला असतानाही खडकवासला प्रकल्प भरलेला नाही. अन्य चार धरणे भरली असली, तरी त्यांच्या पाणलोट क्षेत्रात जोराचा पाऊस नाही. सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस कुकडी खोर्‍यात पडतो. मात्र, तेथील धरणातील पाणीसाठा 68 टक्के आहे. त्यामुळे धरणे भरल्याशिवाय त्यातून पाणी उजनीसाठी सोडता येणार नाही.

अशी आहे उजनी

  • राज्यातील सर्वांत मोठे धरण असलेल्या उजनी धरणाची पाणीसाठा क्षमता 117.24 टीएमसी असून, त्यापैकी अचल साठा 63.53 टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा 53.67 टीएमसी
  • या पावसाळ्यात उजनीत जमा झालेले पाणी 29.41 टीएमसी
  • आजचा एकूण उपयुक्त साठा 8.04 टीएमसी (15 टक्के)
  • उजनीच्या अचल साठ्यातून 50 टक्के पाणी वापरता येते.
  • त्यामुळे वापरण्यासाठी आज उपलब्ध असलेले पाणी 39 टीएमसी
  • जिल्ह्यातील 2,98,944 हेक्टर शेतीला उजनीतून सिंचनासाठी पाणी
  • सोलापूर, पंढरपूर, सांगोला, करमाळा, बार्शी, कुर्डूवाडी, इंदापूर, धाराशिव ही शहरे, सांगोला तालुका आणि तीनशेपेक्षा अधिक गावांना पिण्याचा पाणीपुरवठा.
  • सोलापूर जिल्ह्याला पिण्यासाठी दोन टीएमसी पाणी लागते. मात्र, त्यासाठी उजनी धरणातून 20 टीएमसी पाणी भीमा नदीत सोडावे लागते.
  • धरणाच्या पाठीमागे जलाशयातून पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी लागणारे पाणी 4.68 टीएमसी आणि उपसा सिंचन योजनेचे पाणी 7.62 टीएमसी
  • या रितीने पाण्याचा होणारा वापर 32 टीएमसी.
  • धरण भरल्यावर वर्षभरात बाष्पीभवन होणारे 10 ते 12 टीएमसी पाणी.
  • या वापरानंतर आज सिंचनासाठी पाणी जवळपास शिल्लक नाही.

उजनीत या धरणांतून येते पाणी
धरण                     उपयुक्त साठा (टीएमसी)     टक्केवारी     विसर्ग (क्यूसेक)
खडकवासला
प्रकल्प                        27.54                           94.48              00
मुळशी                       19.87                          98.58                00
पवना                         8.51                             100               1202
चासकमान                 7.58                             100                300
भामा आसखेड           6.77                            88.32                00
वडिवळे                    1.07                             100                  00
आंद्रा                        2.85                            97.38                25
कासारसाई               0.57                             100                1202
घोड                         1.14                            23.40                 00

हेही वाचा

तुला शिकवीन चांगलाच धडा : अक्षरा अधिपती साखरपुडा विशेष सप्ताह

विमानाच्या कर्मचार्‍यांचीच पंखावर दंगामस्ती!

Tur Dal Rate : तूरडाळीचे दर कडाडले ! 170 चा आकडा पार; अन्य डाळीही महागल्या

Back to top button