Tur Dal Rate : तूरडाळीचे दर कडाडले ! 170 चा आकडा पार; अन्य डाळीही महागल्या | पुढारी

Tur Dal Rate : तूरडाळीचे दर कडाडले ! 170 चा आकडा पार; अन्य डाळीही महागल्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गतवर्षी पावसाने झालेले नुकसान आणि यंदा पावसाने दिलेली ओढ, यामुळे उत्पादन केंद्रात सर्वच डाळींचे दर कडाडले आहेत. यामध्ये सर्वाधिक दरवाढ तूरडाळीची झाली असून, घाऊक बाजारात एक किलो तूरडाळीचे दर 150 ते 165 रुपयांवर गेले आहेत. किरकोळ बाजारात एक किलो तूरडाळीची तब्बल 170 ते 180 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. त्यामुळे आम जनता हैराण झाली आहे. हरभराडाळ, उडीदडाळ, मसूरडाळ आणि मूगडाळीच्या दरातही दोन महिन्यांत सरासरी 20 ते 30 रुपयांची वाढ झाली असून, डाळींच्या दरातील तेजी वर्षभर कायम राहण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षी झालेले कमी उत्पादन आणि जागतिक बाजारातील कडधान्यांच्या चढ्या दरांमुळे देशांतर्गत बाजारात डाळींच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. तूरडाळ दोन महिन्यांत 100 ते 110 रुपयांवरून 170 ते 180 रुपयांवर गेली आहे. हरभराडाळ 57 ते 58 रुपयांवरून 70 रुपये प्रतिकिलोवर गेली आहे. उडीदडाळ 90 रुपयांवरून 110 रुपये प्रतिकिलो झाली असून, मसूरडाळीतही किलोमागे दहा-बारा रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. मूगडाळ 80 ते 85 रुपयांवरून 110 रुपयांवर गेली आहे.

कडधान्यांच्या लागवडीत घट

देशभरात खरीप हंगामात कडधान्यांच्या लागवडीत घट झाली आहे. जूनअखेरपर्यंत पेरणीयोग्य पाऊस झाला तरच कडधान्यांची लागवड होते. यंदा जुलैअखेरीस पाऊस झाल्यामुळे कडधान्यांचा पेरा घटला आहे. गेल्यावर्षी 25 ऑगस्टअखेर देशात 128.07 लाख हेक्टरवर कडधान्यांची लागवड झाली होती. यंदा ती 117.44 लाख हेक्टरवर घसरली आहे. तुरीची लागवड 42.11 लाख हेक्टर, उडीद 31.10 लाख हेक्टर, मूग 30.64 लाख हेक्टर, कुळीथ 0.26 लाख हेक्टर आणि अन्य कडधान्यांची 13.34
लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. लागवडीत घट झाल्यामुळे पुढील
वर्षभर डाळींचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.

…तर आणखी दरवाढ

चालूवर्षी पावसाने ओढ दिल्याने खरिपाच्या पेरण्या पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी झाल्या आहेत. सद्यस्थितीत नामांकित कंपन्यांकडे डाळींचा मोठा साठा आहे. डाळींचे वाढते दर व अपुर्‍या पुरवठ्यामुळे त्यांनी विक्री थांबविली आहे. तूरडाळीच्या दरवाढीचे हेही एक प्रमुख कारण आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने जे पीक आहे ते जगवणेही शेतकर्‍यांना कठीण बनल्याचे चित्र आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास डाळींच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी नितीन नहार यांनी वर्तविली.

हेही वाचा

जगातील सर्वात मोठा दरोडा!

अ‍ॅझटेक संस्कृतीमधील दगडी मूर्तींचा शोध

Chandrayan 3 : चंद्रावर कंपने! ILSA कडून पहिल्या नैसर्गिक घटनेची नोंद; रंभाने दिली प्लाझ्मा विषयी महत्वाची माहिती; ISRO ची माहिती

Back to top button