विमानाच्या कर्मचार्‍यांचीच पंखावर दंगामस्ती! | पुढारी

विमानाच्या कर्मचार्‍यांचीच पंखावर दंगामस्ती!

लंडन : हल्ली विमान प्रवासाशी संबंधित अनेक विचित्र बातम्या समोर येत आहेत. त्यापैकी बहुतांश बातम्यांमध्ये प्रवाशांनी भन्नाट प्रकार केल्याचे दिसून येते. काही प्रवाशांनी तर विमानाचा आपत्कालीन दरवाजाही उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दिसते की विमानातील प्रवाशाने नव्हे तर कर्मचार्‍यांनीच असा दरवाजा उघडून दंगामस्ती केली!

या व्हायरल व्हिडीओमध्ये विमानतळावर उभे असलेले ‘बोईंग 777’ दिसत आहे. यावेळी क्रू मेंबर्स विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडून पंखावर येतात. यावेळी ते वेगवेगळ्या पोझ देऊन फोटोही काढतात. विमान कंपनीने सांगितले की त्यावेळी विमानात एकही प्रवासी नव्हता. मात्र, विमानतळावरील अन्य प्रवाशांनी क्रू मेंबर्सचे हे कृत्य पाहून ते मोबाईलच्या कॅमेर्‍यात टिपले. 25 ऑगस्टला शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत दहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

अनेकांनी याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने लिहिले, त्यांचा हा पहिलाच दिवस असेल. दुसर्‍याने म्हटले त्यांना त्यांच्या जीवाची पर्वा नाही का? हा व्हिडीओ ब्यूनोस एरिसमधील असून तो स्विस केबिन क्रूची दंगामस्ती दाखवणारा आहे. आपण सेल्फीच्या नादात काय करीत आहोत याचेही भान या कर्मचार्‍यांना नव्हते. अर्थातच कंपनीने या कर्मचार्‍यांची खरडपट्टीही काढली आहे!

Back to top button