५ वर्षांत भूस्खलनाच्या घटना वाढल्या; वृक्षतोड सह्याद्रीच्या मुळावर | Landslide in Maharashtra | पुढारी

५ वर्षांत भूस्खलनाच्या घटना वाढल्या; वृक्षतोड सह्याद्रीच्या मुळावर | Landslide in Maharashtra

भूस्खलनाचे प्रमाण का वाढत आहे? जाणून घ्या अभ्यासक काय सांगतात | Landslide in Maharashtra

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन : रायगडमधील इर्शाळवाडीत भूस्खलनामुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे. यापूर्वीही तळीये, माळीण अशा घटना घडलेल्या आहेत. संशोधकांनी केलेल्या अभ्यासात सह्याद्रीच्या डोंगररांगात २०१९पासून भूस्खलनाच्या घटनात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे तर गेल्या दशकात लहानमोठ्या अशा १८२३ भूस्खलनाच्या घटना कोयना परिसरात नोंदवल्या गेल्या आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगात होत असलेली बेसुमार वृक्षतोड हे भस्खलनाचे मुख्य कारण ठरत आहे. (Landslide in Maharashtra)

इर्शाळवाडीतील दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता असल्‍याची भीती व्यक्त केली जात आहे. ९८ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.

अशा घटना पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणावर का घडत आहेत, भूस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ का होत आहे, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पण भूस्खलन, दरड कोसळणे यासारख्या घटना का घडतात हे समजून घेणे तितकेच गरजेचे आहे. पश्‍चिम घाट परिसरात भूस्खलन आणि दरड कोसळण्याचे प्रमाण का वाढत आहे? त्याची कारणे आदी बाबींवर कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागातील डॉ. प्रा. अभिजित पाटील यांनी या विषयावर संशोधन केले आहे. (Landslide in Maharashtra)
इर्शाळवाडी

Landslide in Maharashtra : दशकात मोठ्या प्रमाणात भूस्खलनाच्या घटना 

पश्मिम घाट म्हटलं की, हिरवागार निसर्ग, निसर्गाच्या कुशीत वसलेली टुमदार घरे, छोठ्या-मोठ्या डोंगरदऱ्या, धबधबे, जंगलात दूरवर गेलेल्या रानवाटा, नागमोडी रस्ते, घाट आणि जैवविविधतेने समृद्ध असलेला हा पश्मिम घाट पावसाळ्यात अनोखा भासतो. आणखी डोळ्यांना आनंद देणारी बाब म्हणजे पश्मिम घाटातील डोंगरदऱ्यात वसलेली टुमदार गावे; पण पावसाळ्यात पश्‍चिम घाटातील अनेक छोट्या-मोठ्या गावांना पूर, भूस्खलन सारख्या आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. कित्येक गावे भीतीच्या छायेखाली जगत आहेत. प्रा. पाटील यांच्या मते, “अलिकडच्या काही संशोधनानुसार पश्मिम घाटात या दशकात मोठ्या प्रमाणात भूस्खलनाचे प्रमाण वाढत आहे. तर गेल्या काही वर्षात जीवित आणि वित्तहानी करणाऱ्या भूस्खलनाच्या विध्वंसक घटना सातत्याने घडत आहेत. (Landslide in Maharashtra)
जैविविधतेने समृद्ध असलेला पश्मिम घाट
भूस्खलन आपल्याला नवीन नाहीत; पण भूस्खलन झाल्यानंतर जीवित किंवा वित्तहानी झाली की भूस्खलन या आपत्तीकडे आपण गांभीर्याने पाहतो. पण भूस्खलन का होतं, संभाव्य ठिकाणे कोणती आहेत, भूस्खलन होऊ नये म्हणून काय करावे, किंवा झाल्यावर काय करावे या सारख्या बाबींचा विचार करुन उपाययोजना मात्र होताना दिसत नाहीत.

Landslide in Maharashtra : भूस्खलन म्हणजे काय?

मानवी आणि नैसर्गिक कारणांनी भूरुपे बदल प्रक्रियेतील ही एक नैसर्गिक घटना आहे. यामध्ये जमिनीचा मोठा भाग डोंगर उताराच्या दिशेने घसरतो. यामध्ये या जमिनीवरील वनस्पती, घरे आदी बाबीही घसरत असतात. परिणामी अशा घटनांनी अनेक गावे जमिनीखाली गाडली गेली आहेत. महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक भूस्खलनामुळे जीवित आणि वित्तीय हानी होतेच नाही; पण जेव्हा भूस्खलनामुळे जीवित आणि वित्तीय हानी होते तेव्हा त्यास भूस्खलन आपत्ती म्हणतो.

गेल्या दशकात पश्चिम घाटात १८२३ लहाना-मोठ्या भूस्खलनाच्या घटना

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे कार्यरत असणारे अभ्यासक डॉ. प्रा. अभिजीत पाटील यांच्याशी पुढारी ऑनलाइनने संवाद साधला. यावेळी बोलत असताना ते म्हणाले की. गेल्या दशकाचा विचार करता कोयना परिसरात १८२३ लहान-मोठ्या भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. २०२१ वर्षी १२३ अशा लहान-मोठ्या भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. ही संख्या या दशकातील सर्वात जास्त आहे. संपूर्ण घरे दरडीखाली दबली जाऊन निष्पांपाचे जीव जात आहेत. उद्ध्वस्त झालेले आणि उघड्यावर पडलेले संसार, चिखल, मृत्यूचा तांडव, आक्रोश पाहायला मिळत आहे.

२०१९ पासून  सातत्याने वाढ

प्रा. डॉ. अभिजीत पाटील सांगतात, “गेल्या 10 वर्षांत भूस्खलनाचे प्रमाण वाढत आहे असे संशोधनातून निष्पन्न झाले आहे. 2019 पासून तर यामध्ये सातत्याने वाढ होत असून आता या आपत्तीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यात देखील या आपत्तीचे सावट पर्वतीय भागात गडद होताना दिसत आहे. प्रशासकीय स्तरावर दुर्घटना घडून गेल्यावर आपत्ती व्यवस्थापन सुरू होते. दुर्घटना होण्यापूर्वी जर काही ठोस उपाययोजना करण्यात आल्या तर नक्कीच आपत्तीची तीव्रता व मनुष्यहानी कमी करता येऊ शकते.”

भूस्खलनाचे प्रमाण का वाढत आहे?

पावसाळा सुरु झाला की पश्चिम घाटात भूस्खलाच्या घटना आपण पाहत असतो. पण या घटना का वाढत आहे. हे सुद्धा समजून घेणे गरजेच आहे. अभ्यासक डॉ. प्रा. अभिजित पाटील सांगतात, “भूस्खलन ज्या-ज्या ठिकाणी झाले आहे. त्या-त्या ठिकाणची कारणे ही वेगवेगळे पाहायला मिळतात. ही कारणे नैसर्गिक आहे तशीच मानवनिर्मित कारणेही आहेत. नैसर्गिक विचार करता भूकंप, अतिवृष्टी भूगर्भातील अंतर्गत रचना, अतिवृष्टी, खडकाचे प्रकार आणि त्याचा कमकुवतपणा आदी बाबी भूस्खलनासाठी जबाबदार ठरत असतात. पण मानवनिर्मित विचार करता भूस्खलन होण्यास सर्वात मोठ कारण म्हणजे बेसुमार वृक्षतोड.
पश्चिम घाट नव्हे तर भारतासह जगभरात बेसुमार जंगलतोड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. बेसुमार वृक्षतोड हे एक महत्त्वपूर्ण कारण आहे. ज्याच्यामुळे भूस्खलन होण्यास कारणीभूत बाब ठरत आहे. वृक्षतोडीमुळे माती ठिसूळ होण्याची दाट शक्यता असते. माती ठिसूळ झाल्याने मातीचा ढिगारा डोंगर उतारावरुन घसरुन खाली येतो. मोठमोठ्या भेगा जमिनीला पडतात. त्याचबरोबर जगभरात हवामानाची स्थिती बदलत आहे. याचा परिणाम भारतासह जगभरात होत आहे. याचा भारतीय पर्जन्यमानावर परिणाम होत आहे. परिणामी अवेळी पाऊस, कमी पाऊस आणि ढगफुटी सारख्या घटना घडत आहेत. याचा परिणाम प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या भूस्खलनावर होत असतो.
भूस्खलनास मानवनिर्मित कारणांचा विचार करता, बेसुमार आणि अवैध खाणकाम, डोंगर उतारावरची शेती, डोंगरदऱ्यातील पाणी निचरा करण्याची चुकीची पद्धत, चुकीच्या पद्धतीने शेती, विकास कामे आणि त्यामुळे होणारी नैसर्गिक संसाधनांची हानी, यांचा समावेश होतो.  त्याचबरोबर बेजबाबदार पर्यटन, मानवाचा निसर्गातील वाढता हस्तक्षेपही भूस्खलनासाठी कारणीभूत ठरत आहे.
PHOTOS : PHOTOS: एक होतं माळीण गाव...आजही आठवण काढली की अंगावर उभे राहतात शहारे– News18 Lokmat
माळीण येथेही गाव जमिनीखाली गेलेले…

Landslide in Maharashtra : शास्त्रीय उपाययोजनाची गरज

तळीये, माळीण, इर्शाळवाडी सारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून या आपत्तीवर गांभीर्याने शास्त्रीय, प्रशासकीय आणि नैसर्गिक अंगाने विचार करणे गरजेचे आहे. भूस्खलन आपल्याला नवीन नाहीत; पण भूस्खलन झाल्यानंतर जीवित किंवा वित्तहानी झाली की भूस्खलन या आपत्तीकडे आपण गांभीर्याने पाहतो. पण भूस्खलन का होतं, संभाव्य ठिकाणे कोणती आहेत, भूस्खलन होऊ नये म्हणून काय करावे, किंवा झाल्यावर काय करावे या सारख्या बाबींचा विचार करुन उपाययोजना मात्र होताना दिसत नाहीत.

कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य क्षेत्र 

कोल्हापूर जिल्ह्यातील गिरोली आणि पन्हाळ गडाच्या आजूबाजूच्या वस्त्या अतिभूस्खल आपत्तीग्रस्त क्षेत्रात येतात, असे डॉ. पाटील यांनी सांगितले. २४ तासांत जर २५० मिलीपेक्षा जास्त पाऊस पडत असेल तर भूस्खलनाचा धोका वाढू शकतो, असे ते म्हणाले.

२०२१ साली मांदुकली, हरपाव्हडे, गवशी या भागात झालेल्या भूस्खलनाने कित्येक एकरांची शेती शेतकऱ्यांना गमवावी लागली होती. तसेच या भूस्खलनने मलबा (दगड माती) जवळपास २km लांब वाहून नेला होता. हा भाग अत्यंत लोकवस्तीसाठी अत्यंत संवेदनशील बनला आहे. २४ तासात २५०-mm पेक्षा जास्त पाऊस जर या भागात पडत असेल तर भूस्खलनाचा धोका हा या भागात वाढू शकतो. त्यामुळे पावसाच्या तीव्रतेकडे प्रशासनाचे लक्ष असणे आवश्यक आहे.” – प्रा.डॉ. अभिजीत पाटील

हेही वाचा 

Back to top button